कपीलधार येथे प्रशासनाकडून सुविधांचा अभाव
By Admin | Updated: November 4, 2014 01:38 IST2014-11-04T00:32:02+5:302014-11-04T01:38:16+5:30
बीड : यात्रा उत्सव समितीच्या वतीने भाविकांच्या व्यवस्थेची जय्यत तयारी केली आहे़ पंचेवीस शौचालयांची उभारणी समितीने केली आहे़

कपीलधार येथे प्रशासनाकडून सुविधांचा अभाव
बीड : यात्रा उत्सव समितीच्या वतीने भाविकांच्या व्यवस्थेची जय्यत तयारी केली आहे़ पंचेवीस शौचालयांची उभारणी समितीने केली आहे़ मात्र येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पंचेवीस शौचालये अपुरी पडतील़ जिल्ह्यात अगोदरच डेंग्युची साथ सुरू आहे़ अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाने कपीलधार येथील यात्रा महोत्सवाच्या परिसरात फिरते शौचालये उभारणे अपेक्षीत होते. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र सोमवारी कपीलधार येथे पहावयास मिळाले़
बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे मन्मथ स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी देश भरातून लाखो भाविक येतात़ यावर्षी विविध राज्यांमधून पंचेचाळीस दिंड्यासह आठ लाख भाविक श्रीक्षेत्र कपिलधार येथे येणर आहेत़ आलेल्या भाविकांच्या स्रानाची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे़ स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून कपिलधार संस्थानच्या वतीने पंचेवीस शौचालयांची उभारणी केलेली आहे़ परंतु प्रशासनाने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता कपिलधार येथे यात्रेदरम्यान फिरते शौचालये उभारणे आवश्यक होते़ याकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र सोमवारी पहावयास मिळाले़
मोफत आरोग्य सेवा
श्रीक्षेत्र कपीलधार येथील रहिवाशी डॉ. प्रशांत स्वामी यांच्यावतीने मागील तीन वर्षांपासून यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवा दिली जाते. याशिवाय जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देखील कपीलधार येथे आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
येथून येणार दिंड्या
तीन राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात दिंड्यांचे आगमन कपीलधार येथे मंगळवार नंतर होणार आहे. यामध्ये नागापूर, अंबाजोगाई, करडगाव, शिखर शिंगणापूर, बार्शी, माळेगाव, राशीन मठ वसमत, पूर्णा, कळमनुरी, परळी, बीड, गडगा, कासार शिरसी, वाणीजवळा, चापोली, चामरगा, वाई, तमलूर, मदनूर, हादगाव, बिचकुंदा, पुणे, माजलगाव आदी ठिकाणाहून दिंड्यांचे आगमन कपीलधार येथे होणार आहे. अहमदपूर येथून येणारी दिंडी सर्वात मोठी असणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
दिंडी रस्ता बनला खडतर
धुळे-सोलापूर हायवेवरुन मांजरसुंबा घाटापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या श्रीक्षेत्र कपीलधारकडे जाणारा रस्ता कच्चा आहे. मन्मथस्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान लाखो भाविक दिंड्यांमध्ये येत आहेत. मात्र येथील रस्त्याचे काम न झाल्यामुळे भाविकांना खडतर रस्त्यावरुनच चालावे लागणार आहे. यात्रेनिमित्त तरी हा रस्ता दुरुस्त होणे आवश्यक होता, अशा प्रतिक्रिया येथे आलेल्या भाविकांनी व्यक्त केल्या.
मंदिराला तेल चढविण्याचे काम युद्धपातळीवर
मन्मथस्वामींच्या समाधी स्थळावरील मंदिर पुरातन आहे. यामुळे या मंदिराला रंगरंगोटी न करता संस्थानच्या वतीने तेल चढविले जाते. सोमवारी सेवेकरी मंदिराला तेल चढविण्यात मग्न होते. (प्रतिनिधी)