प्रशासकांच्या अनुपस्थितीत तीनच अधिकाऱ्यांची सायकल वारी
By | Updated: December 3, 2020 04:09 IST2020-12-03T04:09:56+5:302020-12-03T04:09:56+5:30
औरंगाबाद : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सायकलवर कार्यालयात येण्याचे महापालिका प्रशासकांचे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच फेरीला चक्क धुडकावून ...

प्रशासकांच्या अनुपस्थितीत तीनच अधिकाऱ्यांची सायकल वारी
औरंगाबाद : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सायकलवर कार्यालयात येण्याचे महापालिका प्रशासकांचे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच फेरीला चक्क धुडकावून लावले. प्रशासक आस्तिक कुमार पांडेय मंगळवारी शहरात नव्हते. ही संधी साधत फक्त तीन अधिकारी व एक कर्मचारी सायकलवर आले.
मागील महिन्यात या मोहिमेच्या पहिल्या दिवशी महापालिका प्रशासकांसह ७ अधिकारी सायकलवर आले होते. मंगळवारी या मोहिमेची दुसरी वारी अत्यल्प प्रतिसादाची ठरली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, विद्युत विभाग प्रमुख ए. बी. देशमुख हे ३ अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी रगडे हे सायकलवर आले होते. प्रशासक पांडेय शासकीय कार्यशाळेसाठी मंगळवारी मुंबईत होते. प्रशासक कार्यालयात नसल्यामुळे सायकल मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.
वाढती लोकसंख्या आणि त्यासोबतच वाहनांच्या वापरात वाढ झाली आहे. वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणातही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण आणि इंधन बचतीसाठी आस्तिक कुमार पांडेय यांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या पहिल्या कार्यालयीन दिवशी सायकलने कार्यालयात येण्याचे आवाहन केले आहे.