जवळपास बाराशे कि.मी. लांबीच्या रस्त्यांची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:08+5:302020-12-17T04:26:08+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते विकास महामार्ग, जागतिक बँक प्रकल्पांतर्गत रस्ते व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत प्रमुख राज्यमार्ग ...

जवळपास बाराशे कि.मी. लांबीच्या रस्त्यांची चाळणी
औरंगाबाद : जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते विकास महामार्ग, जागतिक बँक प्रकल्पांतर्गत रस्ते व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत प्रमुख राज्यमार्ग व जिल्हा मार्ग मिळून ३ हजार ५१० किलोमीटर लांबीचे रस्ते गेले आहेत. यापैकी पाऊस व वर्दळीमुळे ११९९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
तथापि, खराब झालेल्या ११९९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी ५१९ किलोमीटर लांबीच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी ११ कोटी ९० लाख रुपयांचा कार्यक्रम नुकताच मंजूर झाला आहे. याशिवाय पूरहानीमुळे ४९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या ९० कामांसाठी २४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या निविदेप्रक्रियेत ही कामे आहेत.
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनातर्फे द्विवार्षिक कार्यक्रम मंजूर केला जातो. दोन वर्षांत चारवेळा दुरुस्तीची कामे केली जातात. वर्षभरात नवीन दुरुस्तीच्या कामासाठी निधी मंजूर नसल्यामुळे दुरुस्तीवर खर्च करण्यात आला नाही. यंदा पूरहानीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून बहुतांशी पुलांच्या दुरुस्तीची कामे करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील खराब रस्ते......
खुलताबाद तालुक्यातील ‘बाजारसावंगी ते बोडखा’ हा तीन किलोमीटर लांबीचा राज्यरस्ता पावसामुळे अतिशय खराब झाला आहे. त्या रस्त्यावरुन वाहतूक करणे अवघड झाले आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक बाजूच्या रेलइंदापूर या रस्त्यावर वळविण्यात आली आहे.
दुसरा रस्ता औरंगाबाद तालुक्यातील पळशी तसेच पैठण रस्त्यावरील लिंकरोडचा जवळपास १ किलोमीटर लांब रस्ता पावसामुळे खराब झाला आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.
कार्यकारी अभियंत्यांचा कोट..........
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत कुलकर्णी म्हणाले की, प्रामुख्याने जास्त वर्दळ व पावसामुळे दरवर्षी रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. रस्तेदुरुस्तीसाठी द्विवार्षिक कार्यक्रमांतर्गत निधी प्राप्त होतो. त्यानुसार रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून दोन वर्षांत चारवेळा रस्ते दुरुस्त केले जातात. यंदा या कार्यक्रमांतर्गत दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, ही कामे निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडत आहेत.