सिल्लोड बाजार समितीचे ३ कोटी थकले
By Admin | Updated: May 12, 2015 00:54 IST2015-05-12T00:32:33+5:302015-05-12T00:54:35+5:30
श्यामकुमार पुरे , सिल्लोड सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३४ गाळेधारकांकडे

सिल्लोड बाजार समितीचे ३ कोटी थकले
श्यामकुमार पुरे , सिल्लोड
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३४ गाळेधारकांकडे दोन कोटी ६७ लाख ७ हजार ८९० रुपये गाळे भाडे थकले आहे़ त्वरित ही रक्कम न मिळाल्यास लिलाव झालेल्या गाळ्यांचा फेरलिलाव करण्यात येर्ईल, अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती ठगन भागवत यांनी दिली आहे़ विशेष म्हणजे तीन वर्षांपासून गाळेधारकांवर कार्यवाही का करण्यात आली नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे़
२०१२ मध्ये सिल्लोड शहरातील २३ गाळ्यांचा लिलाव झाला होता, तर अजिंठा येथील ४ गाळ्यांचा लिलाव २०१० मध्ये झाला होता. भराडी येथील ७ गाळ्यांचा लिलाव २०११ मध्ये झाला होता़ अशा एकूण ३४ गाळ्यांचा लिलाव करण्यात आला होता. शासनाच्या योजनेतून बाजार समितीला आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी हे गाळे बांधण्यात आले होते. शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना व बाजार समितीचे लायसन्सधारकांना हे गाळे भाड्याने द्यावे असे शासनाचे आदेश आहे; पण यावेळी गाळे लिलाव करताना नियम पाळले गेले नाही आणि धनदांडग्यांना हे गाळे देण्यात आले. या लोकांनी तीन वर्षांपासून लिलावाची रक्कम भरली नाही. त्या गाळ्यांचा लिलाव झाला. बोली बोलणाऱ्यांना ते गाळे ताब्यात देण्यात आले खरे; पण यापैकी बऱ्याच गाळेधारकांनी लिलावात बोललेल्या बोलीची रक्कम बाजार समितीत भरली नाही. ज्या लोकांनी गाळे घेतले त्यापैकी बऱ्याच गाळेधारकांनी या गाळ्यात दुकाने सुरून करता पोटभाडेकरूंना दुकाने दिली.त्यांच्याकडून भाडे वसुली करूनदेखील काही गाळेधारकांनी बाजार समितीचे भाडे लिलावाची रक्कम भरली नाही. यामुळे दोन कोटी ६७ लाख ७ हजार ८९० रुपये थकले.