मोठ्यांना अभय; गरिबांवर टाच!
By Admin | Updated: May 14, 2016 00:14 IST2016-05-14T00:02:50+5:302016-05-14T00:14:20+5:30
औरंगाबाद : खाम नदीच्या पात्रातील अतिक्रमणे काढण्याच्या मुद्यावरून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मोठ्यांना अभय; गरिबांवर टाच!
औरंगाबाद : खाम नदीच्या पात्रातील अतिक्रमणे काढण्याच्या मुद्यावरून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नदी पात्रातील मोठ्या अतिक्रमणांना अभय देण्यात येत आहे. गोरगरीब नागरिकांच्या घरांवर बुलडोझर फिरविण्यात येत आहे. शुक्रवारी नदी पात्रातील एकूण ७ अतिक्रमणे हटविल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
बुधवार ११ मे रोजी महापालिकेने खाम नदीच्या पात्रात मोठी कारवाई केली. त्यानंतर गुरुवारी अत्यंत थातुरमातुर स्वरूपात कारवाई करण्यात आली. तिसऱ्या दिवशी तर महापालिकेने फक्त कारवाईची औपचारिकता पूर्ण केली. दिवसभर नदी पात्रातील माती उचलण्याशिवाय दुसरे काहीच काम केले नाही. खाम नदीतील अतिक्रमणे हटविताना अनेक ठिकाणी पथकाकडून मनमानी करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. गुरुवारी एका डीएड कॉलेजचे अतिक्रमण काढताना या भागातील नगरसेवकाने जोरदार विरोध केला. या विरोधासमोर गुडघे टेकत मनपाने काहीच कारवाई केली नाही. महाविद्यालयाच्या इमारतीवर मार्किंग असतानाही फक्त शौचालय पाडण्यात आले. सुरक्षा भिंत जशास तशी ठेवण्यात आली. तसेच वानखेडेनगर भागात एका बिल्डरानेच नाल्याला संरक्षक भिंत बांधली असून, ही भिंत नदीत बांधून जागा हडप करण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या ठिकाणी केवळ २४ मीटर नदीची रुंदी आहे. त्यामुळे गोरगरिबांची घरे पाडण्यापूर्वी मागील बाजूचे म्हणजेच बिल्डरने केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी करीत नागरिकांनी अतिक्रमणे हटविण्यास विरोध केला.
खाम नदीत वर्षभरापासून मुख्य मल जलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून चेंबर बांधण्यात आले आहे. खोदकाम करताना निघालेला मलबा मात्र अद्यापपर्यंत उचलण्यात आलेला नाही. या मलब्यामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी तुंबण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी हिलाल आणि जलाल कॉलनीत नदी पात्रात पाणी असल्याचे कारण दाखवून मनपाने मोहीम दुपारीच गुंडाळली.