अत्याचार पीडितांना मनोधैर्यचा ‘आधार’
By Admin | Updated: May 26, 2017 00:40 IST2017-05-26T00:39:36+5:302017-05-26T00:40:58+5:30
जालना : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मनोधैर्य योजनेतून जिल्ह्यातील ८५ पीडितांना एक कोटी ७५ लाख रुपयांची मदत देण्यात आली

अत्याचार पीडितांना मनोधैर्यचा ‘आधार’
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ला पीडितांना शारीरिक व मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी आधाराची गरज असते. याकरिता महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मनोधैर्य योजनेतून जिल्ह्यातील ८५ पीडितांना एक कोटी ७५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर तेरा प्रकरणे समितीने रद्द केली आहेत.
अत्याचार पीडितांना समाजात आत्मविश्वासाने राहता, वैद्यकीय मदत, समुपदेश व योग्य कायदेशीर सल्ला मिळावा या उद्देशाने मनोधैर्य योजनेंतर्गत पीडित महिला व अल्पवयीन युवतींना तीन ते दोन लाखांपर्यत मदत केली जाते. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन जिल्हा क्षति साहाय्य व पुनर्वसन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीपुढे वर्र्ष २०१४-१५ महिला व बाल लैंगिक अत्याचारास समोरे जावे लागलेल्या ४२ पीडितांनी आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव सादर केले होते. पैकी ३९ पीडितांचे प्रस्ताव मान्य करत समितीने त्यांना ३१ लाखांची मदत केली. तर तीन प्रस्ताव रद्द करण्यात आले. वर्ष २०१५-१६ मध्ये प्राप्त २७ पैकी २३ पीडितांना ४६ लाखांची मदत करण्यात आली होती. तर वर्ष २०१६-१७ समितीसमोर आलेले २९ पैकी २३ पीडितांचे मदतीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, त्यांना एकूण ९८ लाखांची मदत करण्यात आली आहे. तर सात प्रस्ताव प्रलंबित आहेत. अनेकदा ठाण्यांमधून गुन्हा दाखल झाल्याचा प्राथमिक अहवाल, वैद्यकीय अहवाल वेळेत न मिळाल्यास अत्याचार पाीडितांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागते, असे सूत्रांनी सांगितले.