आषाढीनिमित्त औंढा नागनाथ, नर्सीत भाविकांची मांदियाळी
By Admin | Updated: July 9, 2014 23:54 IST2014-07-09T23:52:53+5:302014-07-09T23:54:27+5:30
नर्सी नामदेव :नर्सी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुधवारी ५० हजार भाविकांची दर्शन घेतले. सकाळी ७ वाजता पुजा झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांची रेलचेल सुरूच होती.
आषाढीनिमित्त औंढा नागनाथ, नर्सीत भाविकांची मांदियाळी
नर्सी नामदेव :नर्सी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुधवारी ५० हजार भाविकांची दर्शन घेतले. सकाळी ७ वाजता पुजा झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांची रेलचेल सुरूच होती. मंदिर संस्थानने भाविकांसाठी व्यवस्था तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
संत नामदेव महाराज यांचे जन्मगाव असलेले नर्सी हे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे बुधवारी असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त नर्सी येथे हिंगोली, परभणी, जिंतूर, सेनगाव, वाशिम, अकोला, बुलडाणा आदी भागातून भाविक संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. जवळपास ५० हजार भाविकांनी बुधवारी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. सकाळी ६ वाजता अॅड. प्रल्हाद उमरेकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. पुजेसाठी यंदा मनोज जैन यजमान होते. यावेळी पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे, उपाधीक्षक निलेश मोरे, प्राचार्य पंडीत शिंदे, माणिकराव पाटील, गोविंदराव गुठ्ठे, प्रकाश थोरात, सतीष विडोळकर, विठ्ठल वाशिमकर, तुळशीराम ठाकरे, डॉ. बालाजी भाकरे, शिवाजी कऱ्हाळे, शाहूराव देशमुख, खंडुजी गायवाळ उपस्थित होते. मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांच्या दर्शनबारीकरीता बॅरेकेटचे लाकडी कठडे बांधून व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक भाविकांना तपासूनच मंदिरात दर्शनासाठी पाठविण्यात आले. (वार्ताहर)
गोकर्ण माळावर भाविकांच्या रांगा
औंढा नागनाथ : आषाढी एकादशी निमित्त येथील गोकर्ण माळावर असलेल्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच भाविकांनी पर्वतरांगा पार केल्या. दिवसभर सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले असून औंढ्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
आषाढी एकादशी निमित्त ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिराच्या उत्तर दिशेला जंगलामध्ये डोंगरात असलेल्या गोकर्ण महादेवाचे दर्शन घेतल्यास पांडुरंगाचे दर्शन घेतल्या समान असल्याने या ठिकाणी अनेक वर्षापासून दर्शन घेण्याची परंपरा आहे.
मात्र अलिकडील पाच वर्षामध्ये या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झालेली आहे. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी डोंगर चढून वर पायी जावे लागते. यामुळे हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या ठिकाणी जाण्यासाठी नागेशवाडी व औंढा तलावाचा कट्टा व वनपर्यटन स्थळाच्या रस्त्यांनी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. या ठिकाणी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील भाविकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे नागनाथ मंदिरात देखील मोठी गर्दी होती. नागनाथ मंदिरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात सकाळी ७ वाजता महापुजा करण्यात आली.
यावेळी विश्वस्त व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी दिवसभर भजन- कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लक्ष्मण केंद्रे, जमादार शंकर इंगोले, नुरखाँ पठाण, सपकाळ आदींनी बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)