अबब... ११ हजार चौरस मीटरची चादर

By Admin | Updated: July 3, 2016 00:45 IST2016-07-03T00:33:10+5:302016-07-03T00:45:12+5:30

औरंगाबाद : कला- कुसरीच्या वस्तू बनविणे, लोकरीपासून स्वेटर, मफलर, पडदे, लहान मुलांचे कपडे विणणे हा बहुसंख्य भारतीय महिलांचा अत्यंत आवडीचा कार्यक्रम.

Aab ... 11 thousand square meters of sheet | अबब... ११ हजार चौरस मीटरची चादर

अबब... ११ हजार चौरस मीटरची चादर

औरंगाबाद : कला- कुसरीच्या वस्तू बनविणे, लोकरीपासून स्वेटर, मफलर, पडदे, लहान मुलांचे कपडे विणणे हा बहुसंख्य भारतीय महिलांचा अत्यंत आवडीचा कार्यक्रम. रिकाम्या वेळात अनेक महिला हौसेने गृहसजावटीसाठी विणकाम करताना दिसतात. भारतीय महिलांनी त्यांच्या याच परंपरागत कौशल्याच्या जोरावर गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डलासुद्धा दखल घ्यायला भाग पाडले आहे. जवळपास २००० महिलांनी एकत्र येऊन तब्बल ११ हजार चौरस मीटरची लोकरीची चादर तयार केली आहे. औरंगाबादच्या संजीवनी मल्लावत यांचा यामध्ये मोलाचा सहभाग होता.
गृहिणी असलेल्या संजीवनी यांना बालपणापासूनच विणकामाची अत्यंत आवड आहे. अशातच त्यांना परिचयातील एका व्यक्तीकडून पुणे येथील ‘मदर इंडिया क्रोशेट क्वीन्स’ या महिलांच्या ग्रुपबद्दल माहिती मिळाली.
हा ग्रुप संपूर्ण भारतातील विणकामाची आवड असणाऱ्या महिलांच्या सहकार्याने एका भल्या मोठ्या चादरीची निर्मिती करत आहे, असे त्यांना समजले. या ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी याकामी योगदान देण्याचे ठरवले. जुलै- २०१५ ते जानेवारी- २०१६ या काळात या महाकाय चादरीची निर्मिती करण्यात आली.
तब्बल ११ हजार चौरस मीटर चादरीसाठी संजीवनी यांनी एक चौरस मीटरचा एक याप्रमाणे ५ चौरस मीटर इतकी चादर विणून दिली. याप्रमाणे प्रत्येक महिलेने १ चौरस मीटरचे अनेक तुकडे करून आणले होते. जानेवारीमध्ये चेन्नई येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या फुटबॉल मैदानात संपूर्ण भारतातून महिला जमल्या होत्या. सगळ्या महिलांनी आणलेले एक चौरस मीटरचे असंख्य तुकडे एकमेकांना जोडून ही विशाल चादर बनविण्यात आली. याप्रसंगी गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. त्यांनी या घटनेची नोंद गिनिज बुकात करून या उपक्रमातील सर्व महिलांना मे महिन्यात प्रमाणपत्र देऊन गौरविले. यानंतर या चादरीचे तुकडे करून ते पांघरूण म्हणून गरजू लोकांना वाटण्यात आले.
माझ्या हौसेचे रूपांतर आज विश्वविक्रम घडविण्यात झाले, याचा मला अत्यानंद वाटतो. याकामी माझे पती राजेश मल्लावत तसेच संपुर्ण कुटुंबानेच मला कायम प्रोत्साहित केले. कॅन्सर पेशंटला लोकरीची टोपी विणून देण्याचा ‘मदर इंडिया क्रोशेट क्वीन्स’ या संस्थेचा आगामी उपक्रम आहे. या उपक्रमातही मी सहभागी होणार आहे. शहरातील ज्या महिलांना कला- कुसरीच्या कामात रस आहे, अशा सर्व महिलांसाठी ‘क्रिएटिव्ह क्लब’ सुरू करण्याचा माझा मानस आहे.
- संजीवनी मल्लावत

Web Title: Aab ... 11 thousand square meters of sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.