फुलंब्री : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी सांजूळ धरणावर आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. समाधान सीताराम वाकळे (रा. सेनगाव, जि. हिंगोली, ह.मु. कुंभेफळ) असे मयताचे नाव आहे.
फुलंब्री तालुक्यातील सांजूळ धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. या ठिकाणी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील ग्रेव्हीज कॉटन कंपनीमध्ये काम करणारे १५ ते २० मित्र रविवारीची सुट्टी असल्याने, एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सर्व मित्र सोबत आणलेले जेवण करीत असताना, समाधान वाकळे या तरुणाला धरणाच्या पाण्यात जाण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे तो पाण्यात उतरला. सुरुवातीला कमी खोल असलेल्या पाण्यात तो फिरला. त्यानंतर, तो खोलगट भागात पोहोचला. तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी आरडाओरड केली. काहींनी पाण्यात जाऊन पहिले; पण दिसून आला नाही. एका मित्राने ११२ ला फोन केला असता, फुलंब्री पोलिस व अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटांतच त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर, तो घाटी रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, समाधान वाकळे हा अविवाहित होता. या घटनेची फुलंब्री पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॅ.प्रमोद म्हसलकर करीत आहेत.