ढोरकीन: भरधाव दुचाकी व कार यांच्यात झालेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील चुलती ठार, तर पुतण्या गंभीर जखमी झाल्याची घटना पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील ढोरकीन येथील कारकीन फाटा चौफुलीवर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. कडूबाई जगन्नाथ नारळे (वय ६५, रा. कारकीन, ता. पैठण) असे मयत महिलेचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्याने शिवाजी पंढरीनाथ नारळे (वय २३, रा. कारकीन) हा त्याची चुलती कडूबाई नारळे यांना दुचाकीवर (एमएच २०-एफई २५७७) घेऊन ढोरकीनकडून कारकीनकडे घरी जाताना कारकीन फाटा चौफुलीवर ढोरकीनकडे भरधाव जाणाऱ्या कारशी (एमएच १२-एसएल ८३७४) दुचाकीची जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील कडूबाई जगन्नाथ नारळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शिवाजी नारळे हा गंभीर जखमी झाला.
याबाबत माहिती मिळताच पैठण एमआयडीसीचे सपोनि ईश्वर जगदाळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपस्थितांच्या मदतीने कडूबाई नारळे यांचा मृतदेह व जखमी शिवाजी नारळे यांना बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे उत्तरीय तपासणी करून कडूबाई नारळे यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी कारकीन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत कडूबाई नारळे यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे, असा परिवार आहे.
जखमीवर घाटीत उपचार सुरूदरम्यान, या अपघातातील गंभीर जखमी शिवाजी नारळे याच्यावर बिडकीन येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत हलविले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.