छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत तिची शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकाने अश्लील कृत्य केल्याची सलग दुसरी संतापजनक घटना घडली आहे. ३१ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी सिडको पोलिसांनी संतोष मधुकर ठाकरे (४६, रा. एन-१३) याला अटक करीत त्याची रिक्षा जप्त केली. ही घटना बुधवारी प्रसिद्धिमाध्यमांसमोर आली.
मंगळवारी मुकुंदवाडी परिसरात ९ वर्षांच्या मुलीसोबत व्हॅनचालकाने अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे विविध स्तरांतून संताप व्यक्त होत असताना ३१ जुलै रोजी पुन्हा अशाच प्रकारची घटना घडली. टी.व्ही. सेंटर चौकातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी मुलगी रिक्षाने ये-जा करते. ३१ जुलै रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे संतोष तिला घेण्यासाठी शाळेत गेला. तिला घेऊन तो एम-२ मार्गे घरी परतत असताना त्याने अचानक निर्मनुष्य परिसरात रिक्षा थांबवली. काॅलवर बोलण्याच्या बहाण्याने मोबाइल हातात धरून अचानक हात मागे करीत मुलीचा विनयभंग केला. यामुळे मुलगी प्रचंड घाबरली. तिने आरडाओरडा केल्याने घाबरलेल्या संतोषने तिला थेट घरी सोडत पोबारा केला.
घरी पोहोचताच मुलगी धाय मोकलून रडायला लागली. आई-वडिलांना तिने प्रकार सांगितला. शिवाय, यापूर्वीही या रिक्षाचालकाने असे कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. संतप्त आई-वडिलांनी थेट सिडको पोलिस ठाणे गाठत निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्याकडे तक्रार केली. वाघमारे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक हरिदास मैंदाड यांनी तपास सुरू केला. संतोष पळण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच मैदाड यांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
मुलगी प्रचंड तणावाखालीया घटनेनंतर मुलगी प्रचंड तणावाखाली गेली आहे. तिला रिक्षा व रिक्षाचालकांची भीती वाटायला लागल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
तीन शाळांच्या विद्यार्थ्यांची ने-आणसंतोष १५ वर्षांपासून तीन शाळांसाठी विद्यार्थ्यांची ने-आण करतो. त्याचा एन-१३ मध्ये फ्लॅट आहे. तो विवाहित असून, त्याला दोन मुली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस चौकशीत ‘माझ्याकडून स्पर्श केला गेला’ अशी त्याने निर्लज्जपणे कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या मालकीची रिक्षा जप्त केली. त्याचा परवाना रद्द करण्यासाठी कारवाई करणार असल्याचे उपनिरीक्षक मैदाड यांनी सांगितले.
शाळेची तातडीने बैठकया घटनेमुळे शाळा व्यवस्थापनालादेखील धक्का बसला. त्यांनी शाळेत तातडीने पालक, स्कूलबस, व्हॅन व रिक्षाचालकांची बैठक घेतली. त्यात सर्व चालकांना सज्जड दम भरण्यात आल्याचे पालकांनी सांगितले.