छत्रपती संभाजीनगर : शिक्षक होण्याचे स्वप्न घेऊन परीक्षेसाठी शहरात आलेल्या युवकावर चाकूहल्ला करीत जिवे मारल्याची घटना ताजीच असताना शनिवारी शहराच्या विविध भागांत जीवघेणा हल्ला केल्याच्या चार घटना उघडकीस आल्या.
घरमालकाचा किरायेदारावर हल्लाहर्सूल परिसरातील जहाँगीर कॉलनीत महंमद जुनेद यांच्या घरात शेख उमर शेख रमजानी हे किरायाने राहत होते. तेव्हा घरमालकाच्या कुटुंबाने ‘आमचे घर का सोडत नाही’ या कारणावरून महंमद जुनेदसह त्यांची बहीण, मेहुणा, भाऊ यांनी शेख उमर यांच्यासह आई-वडील, भाऊ, बहीण यांना शिवीगाळ व मारहाण करून हातातील कड्याने हल्ला केला. त्यात शेख उमर यांना जबर मार लागला. ही घटना ६ जून रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
पत्नीसह नातेवाइकांनी पतीच्या डाेक्यात घातला दगडमुकुंदवाडीतील संजयनगरमध्ये राहणारे प्रदीप दिलीप केदारे यांना त्यांच्या आईने, ‘तुझा मुलगा पत्नीच्या माहेरी गेला आहे. त्यास दारू विकण्यास लावले जात आहे’, असे सांगितले. प्रदीप यांनी पत्नी मयुरीस जाब विचारला असता मयुरीसह तिचा चुलत भाऊ अभिजीत जगताप, मेहुणी आकांक्षा जगताप आणि वंदना शिंदे यांनी मारहाण केली. त्याशिवाय डोक्यावर दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना ३ जूनच्या रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
पैशांच्या वादाचे पर्यावसान चाकूहल्ल्यातहर्षल रतन तायडे (रा. मीरानगर, पडेगाव) यांचा मित्र सागर राठोड याचे विकी पुसे याच्यासोबत पैशांवरून फोनवर वाद झाले. त्यानंतर विकीने हर्षलसह सागर राठोड, गौरव राजगुरे आणि अर्जुन गुंगासे या चौघांना खडकेश्वर मंदिरालगत बोलावले. त्याठिकाणी विकी, गंग्या उर्फ आदित्य चांगले, राहुल माने यांच्या इतर दाेन अनोळखी तरुणांनी चौघांवर जीवघेणा चाकूहल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना ६ जून रोजी दुपारी घडली. याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
जुन्या मित्रानेच केला चाकूहल्लाकिशाेर गोकुळदास चोटिया (रा.कामगार चौक, सिडको) यांच्या घरी ५ जून रोजी सकाळी जुना मित्र प्रवीण व्यंकटराव डांगे (रा. जान्हवी अपार्टमेंट, महाजन कॉलनी) आला. त्याने काहीही न बोलता किशोरवर चाकूने वार केले. जाब विचारताच ‘तू माझ्या बायकोला का खोटे बोलला, मला खर्चाला पैसे दे’ असे म्हणून पुन्हा चाकूहल्ला केला. किशोरच्या पत्नीलाही मारहाण केली. त्यानंतर दोन मुले बेडरुममधून बाहेर आल्यानंतर डांगे दुचाकीवर पसार झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी ७ जून रोजी गुन्हा नोंदवला आहे.