सिल्लोड : दुचाकीवरून जाणारा एक शेतकरी पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात दुचाकीसह पडला. परंतु सुदैवाने कठड्याला अडकल्याने तो बालंबाल बचावला. ही घटना तालुक्यातील धानोरा शिवारात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. धरमसिंग रतनसिंग उसारे (३५, रा. उसारेवाडी, धानोरा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील काकडेवाडीजवळ पूर्णा नदीवर कोल्हापुरी बंधारा आहे. नदीला पाणी असल्याने शेतकऱ्यांनी बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे लावून पाणी अडवलेले आहे. यामुळे काकडेवाडी, उसारेवाडी, पूर्णावाडी, बेलेश्वरवाडी येथील शेतकऱ्यांना धानोरा तसेच पळशीला येण्या-जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. यामुळे परिसरातील शेतकरी या बंधाऱ्याच्या तीन-चार फूट रुंद असलेल्या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून ये-जा करतात. गुरुवारी सायंकाळी याच कोल्हापुरी बंधाऱ्यावरून काकडेवाडीमार्गे भराडी येथून धरमसिंग हा शेतकरी दुचाकीवरून जात होता. धानोरा शिवारातील या बंधाऱ्यावर आल्यानंतर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने धरमसिंग दुचाकीसह नदीत कोसळला. दुचाकी नदीत कोसळली तर धरमसिंग यांनी बंधाऱ्याचा कठडा पकडला.
दैव बलवत्तर म्हणून वाचला जीवदुचाकीसह खाली पडल्यानंतर धरमसिंग यांच्या हाताला बंधाऱ्याचा कठडा लागला. कठडा सोडला तर पाण्यात बुडून आपला मृत्यू होऊ शकतो, अशी मनात भीती बाळगून मला वाचवा.. मला वाचवा.. असे मोठ्याने तो ओरडत होता. परंतु तब्बल एक तास बंधाऱ्यावर कुणीच आले नसल्याने कठड्याला तो लटकलेला होता. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, असे दृष्य होते. तब्बल एक तासाने एक शेतकरी बंधाऱ्याजवळ आल्यानंतर त्याने हे दृष्य बघितले. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना त्याने घटनास्थळी बोलावून घेतले. लागलीच धरमसिंग यांना मोठ्या शिताफीने सर्व शेतकऱ्यांनी ओढून बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून धरमसिंग या घटनेतून बचावला आहे.