छत्रपती संभाजीनगर : हाणामारी, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी सौरभ अनिल भोले (वय २४, रा. समतानगर, क्रांती चौक) याने पोलिस सुरक्षा भेदून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अडवले. मात्र, नशेत असलेल्या सौरभने त्यांच्या अंगावर जात धमकावले. रविवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. सुनियोजित कट आखून सुपारी देऊन हल्ल्याचा प्रयत्न झालाय का, या दिशेने पोलिस तपास करत असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.मंत्री शिरसाट यांचा ताफा घरात जाताच सौरभ थेट आत गेला. शिरसाट घरात गेल्याचे पाहताच त्यानेही घरात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अडवताच त्याने पोलिसांशी झटापट केली. कोणी सर्वसाधारण तरुण असेल, असे वाटल्याने शिरसाट यांनी त्याला सोडून देण्यास सांगितले.
या मुद्द्यांमुळे संशयशिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना सौरभ बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे सांगितले. शिरसाट यांच्या दाव्यानुसार, सौरभ घटनेपूर्वी मित्रांना ‘आज बडा काम मिला है, बहोत पैसे मिलेंगे’ असे सांगून निघाला होता. त्यामुळे त्याला कोणी सुपारी दिलीय का, या दिशेने पोलिस तपास करत आहेत. सौरभने घरात प्रवेशाचा प्रयत्न केला तेव्हाच नेमका शिरसाट यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
खुनी आरोपी जामिनावर २ फेब्रुवारी २०२५ रोजी क्रांतिनगरात कल्पेश रुपेकर या तरुणाची वैभव मालोदे, वैभव गिरी, प्रेम तीनगोटे व सौरभ भोलेने क्रूर हत्या केली होती. त्यात सौरभला अटक झाली. जून महिन्यात तो जामिनावर सुटला. २०२० मध्येही त्याच्यावर हाणामारीचा गुन्हा आहे.