गंगापूर(छत्रपती संभाजीनगर): विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव जिपने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील पती-पत्नीसह त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याचा करूण अंत झाल्याची दुर्दैवी घटना गंगापूर-वैजापूर मार्गावर वरखेड पाटी येथील नांमकाच्या मुख्य कालव्याजवळ सोमवारी(दि.८) सकाळी ७:३० वाजता घडली. सजन राजू राजपूत (२८) शितल सजन राजपूत (२४) कृष्णकुंज सजन राजपूत (१, रा.सर्व सटाणा ता.वैजापूर, हमू.कमळापूर रोड, वाळूज) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.
सजन राजपूत हे पत्नी व एक वर्षाच्या मुलासह सोमवारी सकाळी सटाणा येथून दुचाकी (एम.एच.२० सी.क्यू.०७६६) वर वैजापूरमार्गे वाळूज औद्योगिक वसाहतीकडे निघाले होते. गंगापूर-वैजापूर मार्गावर वरखेड पाटी येथील नांमका कालव्याच्याजवळ सकाळी ७:३० वाजता बारामतीहून वैजापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव जीपने(एम.एच.१९ बीयू ४२१४) राजपूत यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने समोरून जोराची धडक दिली.
दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ.सूर्यवंशी यांनी तपासून तिघांना मृत घोषित केले. शिल्लेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.