९९ हजार शेतकऱ्यांना मिळाले मानसिक बळ!
By Admin | Updated: December 24, 2016 01:02 IST2016-12-24T01:02:08+5:302016-12-24T01:02:45+5:30
जालना जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे.

९९ हजार शेतकऱ्यांना मिळाले मानसिक बळ!
गजेंद्र देशमुख जालना
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना समुपदेशन तसेच मानसिक उपचार करण्यात येत आहेत. गत आठ महिन्यांत ९९ हजार ६७५ शेतकऱ्यांवर मानसिक उपचार तर ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सुमपदेशन करून मानसिक बळ मिळाले आहे.
जिल्ह्यात गत काही वर्षांत दीडशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आदींना कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. इतर शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये, ते मानसिकदृष्ट्या खचू नये म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात प्रेरणा प्रकल्प नावाने केलेल्या उपक्रमास शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा रूग्णायालत एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ९९ हजार ६७५ शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना मानसिक आधार देण्यात आला. आवश्यक असलेली तपासणी करण्यात आलेली आहे. विषारी द्रव प्राशन केलेल्या ३८५ शेतकऱ्यांना परिपूर्ण असे मानसिक समुपदेशन करण्यात आले. त्यांना विष का प्राशन केले. त्यांना कोणत्या आधाराची गरज आहे. कोणते उपचार करण्याची गरज आहे. याची माहिती घेऊन त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले. थोडक्यात त्यांची मानसिक स्थिती सुदृढ करण्याचा प्रयत्न या प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे कक्षाच्या प्रमुख डॉ. एम. डी. मुळे यांनी सांगितले. अति तणावाखाली असलेल्या ३५ शेतकऱ्यांना समुपदेशन तसेच औषधोपचार करण्यात आले. मद्यपानामुळे त्रस्त असलेल्या ४५ शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे मुळे यांनी यावेळी सांगितले.