९७ टक्के मतदान
By Admin | Updated: August 10, 2015 00:58 IST2015-08-10T00:55:47+5:302015-08-10T00:58:22+5:30
औराद शहाजानी / शिरूर अनंतपाळ / चाकूर : लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या औराद शहाजानी, शिरूर अनंतपाळ

९७ टक्के मतदान
औराद शहाजानी / शिरूर अनंतपाळ / चाकूर : लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या औराद शहाजानी, शिरूर अनंतपाळ आणि चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी रविवारी शांततेत मतदान झाले. या तीन्ही बाजार समितीत सरासरी ९७ टक्के मतदान झाले असून, सोमवारी सकाळी ८ वाजता ज्या-त्या बाजार समितीच्या सभागृहांत मतमोजणी होणार आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीची बाजार समिती सर्वात मोठी आहे. या बाजार समितीतील १७ जागांसाठी रविवारी मतदान झाले. एकूण ५१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, ९७ टक्के मतदान झाले आहे. बाजार समिती स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. ५८ गावांतील कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीच्या सोसायटी मतदारसंघातून ११ जागांसाठी ग्रामपंचायत ४, आणि व्यापारी मतदारसंघातून २ अशा एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. औराद, कलमुगळी, अंबुलगा (बु.) येथे मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. ग्रामपंचायत मतदारसंघातून ५१४ पैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात ४६४ मतदारांपैकी ४५३, व्यापारी मतदारसंघातून १०५ मतदारांपैकी १०४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
१०८३ पैकी १००८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततेत मतदान झाले. सोमवारी सकाळी ग्रामपंचायत मतदारसंघाचा अपवाद वगळता उर्वरित मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डी.एम. भुसे यांनी सांगितले.
शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी तर औराद शहाजानी बाजार समितीच्या १७ जागांसाठी व चाकूर बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदारसंघातील दोन जागांसाठी रविवारी मतदान झाले आहे. (वार्ताहर)
शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ९६ टक्के मतदान झाले. एकूण ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १४ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या बाजार समितीची पहिल्यांदाच निवडणूक झाली. त्यामुळे मतदानाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
४शिरूर अनंतपाळ येथे ३ व साकोळ, उजेड, हालकी, येरोळ, हिप्पळगाव येथील प्रत्येकी दोन अशा एकूण १३ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. सोमवारी सकाळी बाजार समितीच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. त्यासाठी चार टेबल असून, १७ अधिकारी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघाची मतमोजणी उद्या होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेषेराव गोगले यांनी सांगितले.
चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आमदार विनायकराव पाटील भाजप-सेना पॅनलच्या १६ जागा यापूर्वीच बिनविरोध निघाल्या आहेत. १८ पैकी १६ जागा बिनविरोध आल्याने ग्रामपंचायत मतदारसंघातील दोन जागांसाठी रविवारी मतदान झाले. विनायकराव पाटील पॅनलकडून प्रशांत पाटील, अशोक नागिमे तर दुसऱ्या पॅनलमधून तुकाराम बागलगावे व दिलीप येणगे यांच्यात लढत झाली आहे. रविवारी सकाळी या दोन जागांसाठी ५९४ मतदारांपैकी ५६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अटीतटीची लढत झाल्याने चाकूर तालुक्याचे मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.
शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ४३ आणि औराद शहाजानी बाजार समितीच्या १७ जागांसाठी ५१ तर चाकूर बाजार समितीच्या दोन जागांसाठी चार अशा एकूण ९८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.