डीसीसीसाठी ९५ टक्के मतदान
By Admin | Updated: May 6, 2015 00:31 IST2015-05-06T00:15:36+5:302015-05-06T00:31:11+5:30
बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १४ जागांसाठी जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान पार पडले.

डीसीसीसाठी ९५ टक्के मतदान
बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १४ जागांसाठी जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान पार पडले. सकाळी ८ ते सांयकाळी ५ या वेळेत ९४.४५ टक्के मतदान झाले. १३१६ पैकी १२४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोणत्याही ठिकाणी गोंधळ झाला नसून शांततेत मतदान प्रक्रीया पार पडली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या १९ जागा होत्या. त्या पैकी पाच जागा बिनविरोध निघाल्याने मंगळवारी १४ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बीड शहरातील तालुका निबंधक कार्यालय, वडवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व उर्वरीत तालुक्यातील तालुका सहनिबंधक कार्यालयात मतदान प्रक्रीया पार पडली. सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत ५० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. त्यानंतर काही पुढील एक तास मतदान प्रक्रीया मंदावली होती मात्र पुन्हा मतदार मतदानासाठी बाहेर पडले. पाच वाजेपर्यंत ९४.४५ टक्के मतदान झाले होते.
मंगळवारी डीसीसी संचालक मंडळासाठी मतदान पार पडले. १४ जागांसाठी एकूण ३२ उमेदवार रिंगणात होते. ७ मे रोजी बीड शहरातील जिल्हा मजूर सहकारी संघाच्या कार्यालयात सकाळी ८ वाजल्यापासून मतदान मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासन तयारी करीत आहे. या ठिकाणी गोंधळ होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
यांनी केले मतदान
आ. अमरसिंह पंडित व जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी गेवराई येथे मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक केंद्र अध्यक्ष म्हणून बी.डी. फलके यांनी काम पाहिले. परळी येथे खा. प्रीतम मुंडे, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे, अॅड. यशश्री मुंडे यांनी आपला हक्क बजावला. माजलगाव येथे माजी आ. प्रकाश सोळंके यांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सदरील निवडणूक सेवा सोसायटी, महिला, अ.जा.ज., वि.जा. भ.ज., इमाव, कृषीपणन, नागरी बँक यांच्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली. जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर व्हीडीओ कॅमेऱ्याद्वारे शुटींग करण्यात आली आहे. बोगस प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेतली होती. तसेच झोनल आॅफिसर प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोठेही गोंधळ झाला नाही. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. (प्रतिनिधी)