९३ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध
By Admin | Updated: June 10, 2014 00:16 IST2014-06-10T00:10:01+5:302014-06-10T00:16:26+5:30
नांदेड : जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रावर सध्या ९३ हजार १७६ मेट्रीक टन खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़
९३ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध
नांदेड : जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रावर सध्या ९३ हजार १७६ मेट्रीक टन खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़
सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात चालू खरीप हंगामात २५ हजार हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांनी घरचे बियाणे प्रक्रिया करुन वापरावे, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कृषी केंद्रावर ९३ हजार १७६ मेट्रिक टन खत उपलब्ध असून यात युरिया ३६ हजार ९९ मे.टन, डीएपी ९ हजार ३६ मे.टन, एमओपी ६ हजार ४३६ मे.टन, संयुक्त खते १६ हजार ६०५ मे.टन, एस.एस.पी. ११ हजार मे.टन याप्रमाणे खताचा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विकास अधिकारी एम. टी. गोंडेस्वार यांनी सांगितले. सोयाबीन हे परागसिंचित पीक असल्यामुळे दरवर्षी पेरणी करण्यासाठी बियाणाची बॅग घेण्याची गरज नसते. एकवेळ बॅग घेतल्यावर त्यापासून होणारे उत्पन्न झालेले सोयाबीन पुढील तीन वर्षापर्यंत बियाणे म्हणून वापरता येते. यासाठी बियाणाची उगवण शक्ती तपासणी करणे व बीजप्रक्रिया करुन वापर करणे आवश्यक असते. खरिपाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतर पेरणी करावी. म्हणजे दोन ते तीन दिवसांत शंभर मि. मी. किंवा चार इंच पाऊस झाल्यानंतर पेरणी करणे योग्य राहिल.
गतवर्षी ७ लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली होती. यात कापूस २ लाख ७७ हजार हेक्टर, सोयाबन २ लाख ७५ हजार हेक्टर, तृणधान्य ९० हजार, कडधान्य १ लाख १६ हजार तर १५ हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली होती. चालू वर्षातील खरीप हंगामात सोयाबीनच्या पेरणीक्षेत्रात २५ हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यात पेरणीसाठी लागणारे बियाणे बाजारात उपलब्ध आहेत. सोयाबीनसाठी महाबीज, खाजगी कंपनी, गोदामातील शिल्लक व शेतकऱ्यांकडे असणारे बियाणे असे शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेवर व रास्त दरात मिळावेत, यासाठी १७ भरारी पथकाची स्थापना केली असून तक्रार निवारण कक्ष, बियाणे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)