अहमदाबाद विमानात पहिल्याच दिवशी ९० टक्के प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:39+5:302021-02-05T04:21:39+5:30
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या १० महिन्यांनंतर बुधवारपासून इंडिगोच्या अहमदाबाद- औरंगाबाद- अहमदाबाद विमान सेवेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी औरंगाबाद-अहमदाबाद विमानात ...

अहमदाबाद विमानात पहिल्याच दिवशी ९० टक्के प्रवासी
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या १० महिन्यांनंतर बुधवारपासून इंडिगोच्या अहमदाबाद- औरंगाबाद- अहमदाबाद विमान सेवेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी औरंगाबाद-अहमदाबाद विमानात ९० टक्के प्रवासी होते. अहमदाबादहून चिकलठाणा विमानतळावर दाखल झाल्यानंतर विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. विमान सेवेच्या पहिल्या दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अहमदाबाहून ४८ प्रवासी शहरात दाखल झाले, तर औरंगाबादहून ६५ प्रवासी अहमदाबादला रवाना झाले, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली. हे विमान ७२ आसनी आहे. अहमदाबादहून येणारे विमान ६६ टक्के तर औरंगाबादहून अहमदाबादला जाणारे विमान ९० टक्के फुल्ल राहिले. त्यामुळे ही विमानसेवा गरजेची आहे, यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी औरंगाबादहून अहमदाबादसाठी विमान सेवा सुरू होती; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशभरातील विमान सेवा ठप्प झाली होती. कोरोनाचा विळखा सैल झाल्यानंतर औरंगाबादहून दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादसाठी विमान सेवा सुरू झाली. अहमदाबादसाठी पुन्हा एकदा विमान सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर ही विमान सेवा सुरू झाली आहे.
प्रवासी, विद्यार्थी, व्यापाऱ्यांना फायदा
या विमान सेेवेमुळे अवघ्या दीड तासात औरंगाबादहून अहमदाबादला पोहोचणे शक्य झाले आहे. त्यामुळे विमान प्रवाशांबरोबर विद्यार्थी, व्यापाऱ्यांनाही या विमान सेवेचा फायदा होईल, असे उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले.
फाेटो ओळ...
इंडिगोच्या अहमदाबाद-औरंगाबाद-अहमदाबाद विमानासह विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, इंडिगोचे कर्मचारी.