कमल तलावावर होणार ९० लाख खर्च
By Admin | Updated: June 22, 2014 00:51 IST2014-06-22T00:41:05+5:302014-06-22T00:51:24+5:30
औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक कमल तलावाच्या विकासासाठी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे.

कमल तलावावर होणार ९० लाख खर्च
औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक कमल तलावाच्या विकासासाठी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या तलावाचा लवकरच विकास करण्यात येणार आहे. तलावाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यासाठी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे जिल्हा नियोजन समितीतून हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरातील आमखास मैदानाशेजारी ऐतिहासिक कमल तलाव आहे. कधी काळी या तलावात कमळाची लाखो फुले होती. अलीकडील काळात या तलावात भराव टाकून अतिक्रमणाचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात लोकमतने काही दिवसांपूर्वीच वृत्त प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तलावाच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या होत्या.
तलावाची पाहणी
संजीव जयस्वाल यांनी स्वत: मनपा आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्यासह बुधवारी या तलावाला भेट देऊन पाहणी केली. तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी ९० लाख रुपयांचा खर्च लागेल. मनपाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांना जिल्हा नियोजन समितीतून हा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच या तलावात पुन्हा एकदा कमळ उमलण्याची शक्यता आहे. हा तलाव शासनाच्या मालकीचा आहे. त्यामुळे तो मनपा आणि जिल्हा प्रशासन अशा दोन्हींच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित केला जाणार आहे.