काळ्याबाजारात जाणारा ९ टन तांदूळ जप्त
By Admin | Updated: August 17, 2014 00:21 IST2014-08-17T00:21:49+5:302014-08-17T00:21:49+5:30
अंबड : अंबड, जालना व इतर ठिकाणी सार्वजनिक वितरणासाठी देण्यात आलेला ९ टन तांदूळ पोलिसांनी शहागड येथे गोंदी पोलिसांनी सापळा लावून पकडला.

काळ्याबाजारात जाणारा ९ टन तांदूळ जप्त
अंबड : अंबड, जालना व इतर ठिकाणी सार्वजनिक वितरणासाठी देण्यात आलेला ९ टन तांदूळ पोलिसांनी शहागड येथे गोंदी पोलिसांनी सापळा लावून पकडला. १४ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एक आयशर व स्कॉर्पियोे जप्त केली. याप्रकरणी गोंदी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड येथे विक्रीेसाठी जालना जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदूळ एक टोळी घेऊन जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांना एका खबऱ्याने दिली. त्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत देशमुख व पोलिसांनी सापळा लावला. मात्र अंबड पोलिसांना गुंगारा देवून आयशर (एम.एच. २० ए.टी. ९५९२) शहागडकडे गेल्याची माहिती गोंदी पोलिसांना देण्यात आली. गोंदी पोलिसांच्या पथकाने आयशर अडवताच स्कॉर्पिओ जीपमधून (एम.एच.१५ डी.सी. ३५९३) जाणारा आरोपी शेख अथर शेख अक्तर हा पोलिसांना धमकावू लागला. मात्र उपविभागीय पोलिस अधीकारी विक्रांत देशमुख व सहाय्यक निरीक्षक अशोक घोरबांड यांनी त्याला पोलिस खाक्या दाखवताच तो वठणीवर आला. त्याच्या ताब्यातून ९ टन तांदूळासह ८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती घोरबांड यांनी दिली. आपेगाव (ता.अंबड) येथील बबन मुरलीधर चौधरीसह चालक शेख अक्तर विरोधात गोंदी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)