आषाढी एकादशीच्या नैवेद्यासाठी ९ हजार लाडू तयार
By Admin | Updated: July 11, 2016 01:13 IST2016-07-11T01:05:38+5:302016-07-11T01:13:59+5:30
औरंगाबाद : ‘विठ्ठल, विठ्ठल जयहरी विठ्ठल’ असे नामस्मरण करीत रविवारी तीन तासांत महिला भाविकांनी शेंगदाणा व गुळाचे ९ हजार लाडू तयार केले.

आषाढी एकादशीच्या नैवेद्यासाठी ९ हजार लाडू तयार
औरंगाबाद : ‘विठ्ठल, विठ्ठल जयहरी विठ्ठल’ असे नामस्मरण करीत रविवारी तीन तासांत महिला भाविकांनी शेंगदाणा व गुळाचे ९ हजार लाडू तयार केले. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व लाडू मोठ्या पंढरपुरात वारकऱ्यांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली असताना शहरातील महिला भाविकांना लाडूरुपी महाप्रसाद तयार करण्यातच विठोबाचे दर्शन झाल्याचा परमानंद मिळाला. भक्तीला सेवेची जोड मिळाल्यावर प्राप्त होणाऱ्या आत्मानंदाची अनुभूती सर्वांनी घेतली.
डॉ. मंगलनाथ महाराज सेवा संघाच्या वतीने मागील ११ वर्षांपासून आषाढी एकादशीसाठी लाडू तयार करण्याचा सेवाभावी उपक्रम राबविला जात आहे. शेकडो मैलांचा पायी प्रवास करून पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांना आपल्या हाताने तयार केलेला फराळ मिळावा यापेक्षा परमानंद कोणता, या भावनेने प्रेरित झालेल्या महिलांनी जवाहर कॉलनी परिसरातील न्यू शांतीनिकेतन कॉलनी येथे सकाळी १० वाजता शेंगदाणा व गुळाचे लाडू तयार करण्यास सुरुवात केली. आपल्या हाताने तयार केलेल्या लाडूचा नैवेद्य पंढरपूरच्या विठोबाला दाखविण्यात येणार व तो प्रसाद नंतर भक्तांना मिळणार याचा आनंद प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर झळकत होता. अवघ्या तीन तासांत ९ हजार लाडू तयार झाले. विठ्ठल भक्तांसाठी लाडू तयार करून आत्मानंद मिळाला, अशी भावना संगीता भागवत यांनी व्यक्त केली. प्रतिमा चव्हाण, ज्योती घुले, दीपा मेहता, ताराबाई घुगे, कमलाबाई ढाकणे, राधा पवार, सुनीता झिरपे यांच्यासह शेकडो महिलांनी लाडू तयार केले.