‘जलयुक्त’ लातूरसाठी मुस्लिम समाजाकडून ९ लाखांचा निधी
By Admin | Updated: May 22, 2016 00:02 IST2016-05-21T23:51:50+5:302016-05-22T00:02:15+5:30
लातूर : मांजरा नदी पुनरुज्जीवन कामास समाजातील सर्वच घटकांचा सहभाग लाभत आहे़ मुस्लिम समाजानेही एक पाऊल पुढे टाकत या चळवळीत आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला

‘जलयुक्त’ लातूरसाठी मुस्लिम समाजाकडून ९ लाखांचा निधी
लातूर : मांजरा नदी पुनरुज्जीवन कामास समाजातील सर्वच घटकांचा सहभाग लाभत आहे़ मुस्लिम समाजानेही एक पाऊल पुढे टाकत या चळवळीत आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला अन् शुक्रवारी दुपारी नमाजनंतर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत जलयुक्तचे मार्गदर्शक डॉ़ अशोक कुकडे यांच्याकडे तब्बल ९ लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला़
लातूर शहरातील मस्जिद रोडवरील मदरसा मिस्बाहुल उलुम येथे जलयुक्त लातूरच्या व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला़ मरकज मस्जिदीमध्ये नमाज अदा करताना मौलानांनी आवाहन केले, लातूरच्या पाण्याची भिषणता दिवसेंदिवस वाढत आहे़ जलयुक्त लातूर चळवळीने हाती घेतलेले काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे़ त्यामुळे समाजाने घडेल ती मदत करावी़ याची लागलीच सुरूवात झाली असून आता मदतीचा ओघ वाढणार आहे़
मदरसा मिस्बाहुल उलूम येथे मदरशाचे अध्यक्ष मौलाना अ. गफूरसाब यांच्या अध्यक्षतेखाली हा निधी वितरणाचा कार्यक्रम झाला़ यावेळी अॅड़ त्र्यंबकदास झंवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड़ व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, अॅड. मनोहरराव गोमारे, निलेश ठक्कर, महादेव गोमारे, विक्रांत गोजमगुंडे, योगेश कर्वा, मौलाना मोहियोद्दीन अली, उद्योजक सय्यद सल्लाऊद्दीन, फय्याज पटेल, जमीलनाना यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले, आता पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत़ लातूर शहरातील मस्जिद, मदरशांमध्ये जलपुनर्भरणाचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी आरिफ पटेल, मुफ्ती ओवेस, सय्यद कलीम, मौलाना सोहेल, पाशामियॉं बिरादार, फारुख भाई, कलीम शेख, शेरखॉं पठाण, आयुब तांबोळी आदींही उपस्थित होते.
व्हीकेसी प्राईड फुटवेअर कंपनीचे अध्यक्ष व्हीकेसी मोहम्मद कोया हे नवनिर्वाचित आमदार असून त्यांच्या प्रयत्नातून हा निधी जमा करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने उद्योजक सय्यद सल्लाउद्दीन यांनी दोन लाख ५० हजार, अॅड. जहीरोद्दीन सय्यद व समद काझी यांनी प्रत्येक ५ हजार, सय्यद कलीम यांनी २१०० रुपये व कलीम खोरीवाले यांनी १ हजार रुपये वैयक्तिकरीत्या दिले.