‘डीसीसी’साठी ९८़९५ टक्के मतदान

By Admin | Updated: May 8, 2015 00:27 IST2015-05-08T00:24:25+5:302015-05-08T00:27:06+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी गुरूवारी मतदान प्रक्रिया झाली़ जिल्ह्यातील ८५७ मतदारांपैकी

9 86.95 percent polling for 'DCC' | ‘डीसीसी’साठी ९८़९५ टक्के मतदान

‘डीसीसी’साठी ९८़९५ टक्के मतदान



उस्मानाबाद : जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी गुरूवारी मतदान प्रक्रिया झाली़ जिल्ह्यातील ८५७ मतदारांपैकी ८४८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून, ९८़९५ टक्के मतदान झाले आहे़ तर ८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली असून, एका मतदाराला नावात बदल असल्याने मतदानापासून वंचित रहावे लागले़ राष्ट्रवादी-भाजपा विरूध्द काँग्रेस- शिवसेना अशा दुरंगी लढतीतील चुरस पाहता शनिवारी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़
आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच बिनविरोधच्या चर्चेला सुरूवात झाली होती़ उस्मानाबाद ते मुंबई पर्यंत बिनविरोधसाठी चार बैठकाही झाल्या़ अर्ज मागे घेण्याच्या पूर्व संध्येला झालेल्या अखेरच्या बैठकीत जागा वाटपावर अंतीम तोडगा निघाला नाही़ त्यानंतर सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादी विरूध्द महायुती अशी लढत होईल, असे तर्क लावले जात असतानाच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी- भाजपाने व काँग्रेस - शिवसेनेने एकत्रित पॅनल टाकल्याचे जाहीर केले़ जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहता राष्ट्रवादी काँग्रेसव काँग्रेसने यापूर्वी आघाडी करून जिल्हा बँकेसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लढविल्या आहेत़ मात्र, वेळोवेळी होणारी काँग्रेस व शिवसेनेची छुपी आघाडी सर्वश्रूत होती़ यंदाच्या निवडणुकीत प्रथमच उघडपणे काँग्रेस-शिवसेनेने पॅनल निवडणुकीत उतरविले होते़
तर भाजपा- राष्ट्रवादीने एकत्रित येवून पॅनल उभा केला होता़ प्रचारादरम्यान राष्ट्रवादी- भाजपाकडून आ़ राणाजगजितसिंह पाटील, माजी खा़डॉ़पद्मसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी तर शिवसेना- काँग्रेसकडून आ़ मधूकरराव चव्हाण, आ़ बसवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, तानाजी सावंत, माजी आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह रासपाचे आ़ महादेव जानकर यांनी प्रचारात उडी घेतली होती़ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत थेट मतदारांपर्यंत पोहचून प्रचार यंत्रणा राबविण्यात आली़ दोन्ही पॅनलकडून बँकेला शासनाकडून मदत मिळवून देण्याचा विश्वास मतदारांसह सर्वसामान्य सभासद, ठेवीदारांना प्रचारादरम्यान देण्यात आला आहे़ सर्वच गटातील मतदार आणि संस्थांवरील सत्ता पाहता विजयाचे आखाडे बांधण्यात आले आहेत़ प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थेट मतदारांशी संपर्क साधून प्रचार यंत्रणा राबविण्यात आली़ जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रावर गुरूवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत ८५७ मतदारांपैकी ८४८ जणांनी मतदान केले़ जिल्ह्यात सरासरी ९८़९५ टक्के मतदान झाले़ सर्वच मतदान केंद्रावर उमेदवारांसह नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती़ जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया झाली़ पोलीस प्रशासनानेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ ३८ उमेदवारांचे भवितव्य गुरूवारी मतपेटीत बंद झाले असून, शनिवारी उस्मानाबाद येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील महसूल भवनमध्ये मतमोजणी प्रक्रिया होणार आहे़ या मतमोजणीकडे उमेदवारांसह अवघ्या जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़(प्रतिनिधी)
जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी-भाजपा विरूध्द काँग्रेस- शिवसेना अशी झाली असली तरी ८ अपक्षांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे़ यातील महेंद्र धुरगुडे यांनी सतीश दंडनाईक यांना पाठींबा दिला होता़ उर्वरित सात अपक्ष उमेदवार किती मतदान खातात याचीही चिंता संबंधित गटातील दोन्ही पॅनलधमील उमेदवारांना आहे़
उमरगा तालुक्यातील सोसायटी मतदार संघातील धाकटीवाडी गावातील मतदार लक्ष्मण शिवाजी सास्तुरे यांचे मतदार यादीत लिंबाजी शिवाजी सास्तुरे असे नाव झाले होते़ त्यामुळे मतदार यादीतील नावात बदल झाल्यामुळे सास्तुरे यांना मतदानापासून वंचित रहावे लागले आहे़
उस्मानाबाद तालुक्यातील इतर शेती गटातील मतदार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, वाशी तालुक्यातील विकासे मधील इंदापूरचे सरपंच रमेश पाटील, पार्डी येथील विलास चौधरी, तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील उत्तमराव लोमटे, तर उमरगा तालुक्यातील पुष्पा कदम, जितेंद्र शिंदे, अजय मोरे व इतर एकाने मतदानाकडे पाठ फिरविली असून, एकाच्या मतदार यादीतील नावात घोळ झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही़

Web Title: 9 86.95 percent polling for 'DCC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.