सरासरीच्या ८६ % कमी पाऊस
By Admin | Updated: July 7, 2014 00:42 IST2014-07-07T00:29:49+5:302014-07-07T00:42:55+5:30
औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. सुरुवातीची दोन्ही नक्षत्रेकोरडी गेली आहेत.

सरासरीच्या ८६ % कमी पाऊस
औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. सुरुवातीची दोन्ही नक्षत्रेकोरडी गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. आजपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात ८६ टक्के कमी पाऊस झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळाचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. जून महिन्यात सुरुवातीला दोन पाऊस झाले. त्यानंतर पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्याही होऊ शकलेल्या नाहीत. मृग आणि आर्द्रा नक्षत्रे जवळजवळ कोरडी गेली आहेत. ६ जुलैपर्यंत जिल्ह्यात १६३ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. आतापर्यंत केवळ २२.७५ मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंतच्या सरासरीचा विचार करता हा पाऊस सरासरीच्या केवळ १४ टक्केच आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६७५ मि.मी. आहे.
वार्षिक सरासरीचा विचार केल्यास त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३.३७ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यात सर्वात कमी पाऊस अनुक्रमे ५.७५ आणि ९.४८ मि.मी. झाला आहे.
मराठवाड्यातील ७४ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस
पावसाने केवळ औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यावरही यंदा अवकृपा केली आहे. विभागातील ७६ तालुक्यांपैकी केवळ २ तालुक्यातच ५० टक्क्यांच्या वर पाऊस झाला आहे. महसूल मंडळांचा विचार करता ४२१ मंडळांपैकी २१ मंडळात ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उर्वरित मंडळांमध्ये पावसाची आतापर्यंची सरासरी खूप कमी आहे.
ढगांची हुलकावणी
शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण व उकाडाही जाणवत होता. त्यामुळे सर्वत्र काळे ढग दाटून आल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, तो आलाच नाही. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते.