नऊ मतदारसंघांत ८३ जणांनी भरले उमेदवारी अर्ज
By Admin | Updated: September 27, 2014 01:10 IST2014-09-27T00:59:46+5:302014-09-27T01:10:38+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत शुक्रवारी तब्बल ८३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

नऊ मतदारसंघांत ८३ जणांनी भरले उमेदवारी अर्ज
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत शुक्रवारी तब्बल ८३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पैठण विधानसभा मदारसंघात सर्वाधिक १७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शहरातील तीन मतदारसंघांत ३२ जणांचे अर्ज दाखल झाले. आज उमेदवारी भरणाऱ्यांमध्ये आ. राजेंद्र दर्डा आणि आ.अब्दुल सत्तार यांचाही समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या २७ सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे आज इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी भाऊगर्दी केली. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून आज काँग्रेसचे उमेदवार डॉ. जितेंद्र देहाडे यांनी अर्ज भरला. रंजना शिंदे, सोमीनाथ महापुरे, सुगंधा दाभाडे, गजानन नांदूरकर, मनीषा अडकुळे, हरिभाऊ शेळके आणि राजकुमार दिवेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले. मधुकर सावंत यांनी आज आणखी तीन अर्ज भरले.
आ. राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासह सात जणांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये माजी खासदार उत्तमसिंह पवार, सुनील अवचरमल, पुष्पा जाधव, जवाहरलाल भगुरे, शेख जियाउल्ला शेख आणि उद्धव बनसोडे या अपक्षांचा समावेश आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून ९ जणांचे अर्ज दाखल झाले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विनोद पाटील, मनसेच्या वतीने राज वानखेडे तसेच मुकेश लाहोट, सय्यद मुशीर हुसैन, फारुखी मोईनोद्दीन, खान मेहरुन्निसा हमीद आणि भीमराव सोनवणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.
वैजापूर विधानसभा मतदारसंघात आज काँग्रेसच्या वतीने दिनेश परदेशी यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाऊसाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केला. भाजपाच्या वतीने एकनाथ जाधव, बसपाच्या वतीने बाबासाहेब पगारे आणि भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रामहरी जाधव यांनी अर्ज दाखल केला. याशिवाय ज्ञानेश्वर आदमाने, सुरेश निचळ आणि श्रीराम पवार यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले.
सिल्लोड मतदारसंघातूनही आज १० जणांचे अर्ज दाखल झाले. आ. अब्दुल सत्तार यांनी आज काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला. मनसेच्या वतीने दीपाली काळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बन्नेखाँ नूरखाँ पठाण, भाजपातर्फे सुरेश बनकर, बसपातर्फे दादाराव आळवणे आदींनी अर्ज दाखल केले. कन्नड विधानसभा मतदारसंघातून मनसेतर्फे सुभाष पाटील, भाजपातर्फे संजय गव्हाणे, बसपातर्फे केशव राठोड, काँग्रेसकडून तात्याराव पाटील यांच्यासह एकूण ८ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. फुलंब्री मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने आ. कल्याण काळे यांनी उमेदवारी अर्ज भरला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनुराधा चव्हाण, भाजपाच्या वतीने हरिभाऊ बागडे यांनीही आपले अर्ज दाखल केले. या मतदारसंघात आज ९ जणांचे अर्ज दाखल झाले. पैठण मतदारसंघातून मनसेच्या वतीने सुनील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. संजय वाघचौरे, शिवसेनेचे संंदीपान भुमरे, काँग्रेसचे विनोद तांबे, रामनाथ चोरमले, रवींद्र काळे, बसपाच्या वतीने अकबर रहिमोद्दीन यांच्यासह १३ जणांनी उमेदवारी अर्ज भरले.
गंगापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृष्णा पाटील, विलास चव्हाण, रिपाइंच्या वतीने मिलिंद बोराडे यांच्यासह १० जणांचे अर्ज दाखल झाले.