६४ दिवसात कॅज्युअल्टीत ८३ कोरोना बाधितांचा मृत्यू, ३ ब्राॅट डेथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:03 IST2021-05-05T04:03:56+5:302021-05-05T04:03:56+5:30
औरंगाबाद - ग्रामीणसह शहरी भागातून रुग्ण शेवटच्या क्षणी उपचारासाठी दाखल होत आहेत. तब्बल १८७ रुग्णांचा घाटीत भरती झाल्यावर अवघ्या ...

६४ दिवसात कॅज्युअल्टीत ८३ कोरोना बाधितांचा मृत्यू, ३ ब्राॅट डेथ
औरंगाबाद - ग्रामीणसह शहरी भागातून रुग्ण शेवटच्या क्षणी उपचारासाठी दाखल होत आहेत. तब्बल १८७ रुग्णांचा घाटीत भरती झाल्यावर अवघ्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयात १ मार्च ते ३ मे दरम्यान १२४१ बाधितांचे मृत्यू झाले. त्यात ८३ बाधित कॅज्युअल्टीत तर ३ ब्राॅट डेथ अर्थात घाटीत दाखल करण्यापूर्वी झालेल्या मृत्यूचा समावेश आहे. आयसीयू -एमआयसीयूत ३९.८९ टक्के तर ५३.४२ टक्के रुग्ण उपचारादरम्यान दगावले असून, कॅज्युअल्टीत मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण तर ६.६९ टक्के आहे.
जिल्ह्यातील १ एप्रिल ते २ मे दरम्यान ८५३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर १ मार्च ते १ एप्रिल दरम्यान २१० बाधित उपचारादरम्यान दगावले. १ मार्च ते २ मे दरम्यान १२८६ जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला तर एकट्या घाटी रुग्णालयात या काळात १२४१ जण दगावले. यात १५ टक्के बाधितांचा मृत्यू हा कॅज्युअल्टीसह वार्डात भरती झाल्यावर अवघ्या २४ तासांत झाल्याचे नोंदविले गेले, अशी माहिती घाटीचे डेथ ऑडिट कमिटीचे प्रमुख डाॅ. अनिल जोशी यांनी सांगितली. घाटीत भरती रुग्ण केवळ जिल्ह्यातीलच नसून शेजारील जिल्ह्यांमधूनही रुग्ण येथे उपचारासाठी दाखल असून बाधितांच्या मृत्यूतही सर्वच शेजारील जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे. हे प्रमाण चिंताजनक असून, गंभीर होईपर्यंत दुखणे अंगावर काढू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
फेब्रुवारीच्या अखेर दुसऱ्या लाटेची चाहूल लागली. १ मार्चला उपचार सुरु रुग्णांची संख्या २,१९२ होती. तर बाधित तीनशे ते चारशे दरम्यान आढळून येत होते. त्यावेळी आरोग्य सुविधा पुरेशा होत्या. मात्र, हळूहळू रुग्णवाढीचा आणि पाॅझिटिव्हीटीचा दरही वाढत गेल्याने एप्रिलच्या सुरुवातीला सक्रिय रुग्णसंख्या १५ हजारावर गेली. आरोग्य यंत्रणेवर ताण पडल्याने बेड, व्हेंटिलेटर बेडची शोधाशोध सुरु होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बेड, व्हेंटिलेटरची संख्या वाढली. तसेच सक्रिय रुग्णसंख्याही ११ हजारापर्यंत पोहचली. तरी बाधित, लक्षणे असलेल्या रुग्णांनी उपचाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्यावे, असे आवाहन घाटीकडून करण्यात आले.
---
१ मार्च ते ३ मे पर्यंत घाटी रुग्णालयातील आकडेवारी
---
विभाग - मृत्यू -टक्केवारी
---
आयसीयू,एमआयसीयू -४५९ -३९.८९
कॅज्युअल्टी - ८३ -६.६९
वार्ड -६६३ -५३.४२
ब्रॉट डेड -३ -०.२४
--
भरती झाल्यावर २४ तासांत १८७ मृत्यू
---
एकट्या घाटी रुग्णालयात १ मार्च ते ३ मे दरम्यान १२४१ कोरोना बाधितांचे मृत्यू झाले. त्यात कॅज्युअल्टीमध्ये ८३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ३ जण ब्रॉट डेड म्हणून कॅज्युअल्टीत दाखल झाले. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक असून शहरातील रुग्णांचाही समावेश आहे. गंभीर कोरोना रुग्ण उपचारासाठीची व्यवस्था असलेल्या घाटीत शेवटच्या क्षणी उपचारासाठी दाखल झाल्याने भरती झाल्यावर २४ तासांत मृत्यू झालेल्यांची संख्या १८७ आहे. हे प्रमाण १५.१ टक्के असून चिंताजनक आहे.
--
शहर आणि ग्रामीण मधून अत्यंत शेवटच्या क्षणी कॅज्युअल्टीला रुग्ण येतात. हा महत्त्वाचा विषय आहे. त्यांना उशीर का होतो हे अद्याप कळलेले नाही. परवाचेही असेच एक उदाहरण आहे. १९ एप्रिलला एचआरसीटी केला. आरटीपीसीआर केलीच नाही. घरीच उपचार घेतले. गेल्या आठवड्यात येऊन शहरात भरती झाला. एक दिवस तिथे राहून घाटीत कॅज्युअल्टीत रुग्ण आला. दोन वेळ ९० सॅच्युरेशन येऊन एकदम ऑक्सिजन कमी झाला व रुग्ण दगावला. दोन तासात मृत्यू म्हणजे कॅज्युअल्टी डेथच म्हणावे लागेल. तो रुग्णाचा निष्काळजीपणा झाला. त्याने उपचार घ्यायला उशीर केला. असे अनेक रुग्ण येताहेत. अंगावर काढून शेवटच्या क्षणी येतात. त्यामुळे उपचारात उशीर होतो. त्यात रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक आहे.
-डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी तथा अध्यक्ष जिल्हा टास्क फोर्स