जिल्ह्यातील ८२६ प्रकरणात झाली आपापसात तडजोड
By Admin | Updated: April 9, 2017 23:37 IST2017-04-09T23:32:47+5:302017-04-09T23:37:08+5:30
उस्मानाबाद : येथील न्यायालयात राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत पार पडली.

जिल्ह्यातील ८२६ प्रकरणात झाली आपापसात तडजोड
उस्मानाबाद : येथील न्यायालयात राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. यात विविध स्वरुपाच्या ८२६ प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात येऊन मोटार अपघात, कामगार नुकसान भरपाई प्रकरणात पक्षकारांना १ कोटी ७ लाख ६१ हजार रुपयांचा मावेजा देण्यात आला.
पक्षकार, विधिज्ञ मंडळ, जिल्हा सरकारी वकील यांच्या हस्ते लोकअदालतीचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर.आर. देशमुख, प्राधिकरणाचे सचिव एस.आर. पडवळ, सर्व न्यायिक अधिकारी, उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष निलेश बारखेडे, उपाध्यक्ष रमेश भोसले, जिल्हा सहाय्यक सरकारी वकील जयंत देशमुख यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
या लोकअदालतीत जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रलंबित प्रकरणे तसेच दावापूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यासाठी ठेवण्यात आली होती. यापैकी दिवाणी स्वरुपाची ४४९,मोटार अपघात, कामगार नुकसानभरपाईची १६,भूसंपादन १०४,फौजदारी १६४,तडजोडपात्र, वैवाहिक संबंधाची ११, धनादेशाची ६२, तर विविध बँकांची २० दावापूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली. मोटार अपघात, कामगार नुकसानभरपाई प्रकरणामधील पक्षकारांना १ कोटी ७ लाख ६१ हजार रुपयांचा मावेजा देण्यात आला. धनादेश प्रकरणात फिर्यादी पक्षाला २८ लाख ५९ हजार ९१४ रुपयांची वसुली करून देण्यात आली. भूसंपादन प्रकरणामध्ये ११ कोटी २० लाख ८० हजार ८०४ रुपये मावेजा मंजूर होऊन रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली. तसेच काही वसुली दरखास्तीमध्ये ५२ लाख ५३ हजार ३३२ रुपयांची वसुली मिटविण्यात आली असून, २० दावापूर्व प्रकरणामध्ये १ लाख ५ हजार १०० रुपये रकमेची तडजोड झाली. अदालतीमध्ये न्यायिक अधिकारी म्हणून एस.आय. पठाण, आर. एन. रोकडे, एस.आर. पडवळ, डॉ.रचना तेहरा, एस.बी. देसाई, आर. के. राजेभोसले, एन. पी. पवार, एस.ए. जमादार, ए.सी. पारशेट्टी, ए. एस. बिराजदार, ए.ए. बाबर आदींनी काम पाहिले. (प्रतिनिधी)