८२ छावण्यांची झाडाझडती
By Admin | Updated: December 23, 2015 23:57 IST2015-12-23T23:10:04+5:302015-12-23T23:57:38+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड खैरात वाटल्याप्रमाणे जिल्हयात एकाच गावात दोन-दोन छावण्यांना मंजुरी आहे. छावण्या मिळवून मालामाल होण्याचे स्वप्न पहाणाऱ्यांचे मनसुभे

८२ छावण्यांची झाडाझडती
व्यंकटेश वैष्णव , बीड
खैरात वाटल्याप्रमाणे जिल्हयात एकाच गावात दोन-दोन छावण्यांना मंजुरी आहे. छावण्या मिळवून मालामाल होण्याचे स्वप्न पहाणाऱ्यांचे मनसुभे उधळण्याच्या मार्गावर आहेत. मंगळवारी चाळीस पथकांकडून ८२ वर छावण्यांची महसूल विभागाच्या पथकांकडून झाडाझडती करण्यात आली. निकष न पाळणाऱ्या छावण्या कारवाईच्या रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हयात एकूण १०२ छावण्यांना मंजूरी आहे. पैकी ८२ सुरू आहेत. सातत्याने तीन वर्षापासून जिल्हयात दुष्काळ आहे. अत्यल्प पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या चाऱ्याची टंचाई आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र एक ते दीड किलो मीटर अंतरावरच छावण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
मंगळवारी केलेल्या तपासणीमध्ये बहुतांश छावण्यांनी शासनाचे निकष पायदळी तुडविल्याचे आढळून आले आहे.
खापरपांगरी, उखंडा
छावणीला पुन: परवानगी
बीड तालुक्यातील खापरपांगरी, शिरूर कासार तालुक्यातील उखंडा चकला येथील छावण्यांमध्ये त्रुटी आढळल्याचा ठपका ठेवत त्यांचा परवाना रद्द केला होता. दोन्ही संस्थांनी अपील केल्यानंतर परवाना नियमित करण्यात आला आहे. दरम्यान, खापरपांगरी येथील छावण्यामध्ये १२०० हून अधिक तर उखंडा छावणीत ८०० हून अधिक गुरे आहेत. परवाना नसतानाही या गुरांचा १२ दिवस संस्थांनी सांभाळ केला आहे.
खापरपांगरी येथील छावणीमध्ये परराज्यातील गुरे असल्याचा ठपका तपासणी अधिकाऱ्यांनी ठेवला होता. प्रत्यक्षात ही गुरे स्थानिक शेतकऱ्यांचीच असल्याचे छावणी संचालक अशोक हिंगे म्हणाले. गुरांची नोंदणी करताना शेतकऱ्यांचा सातबारा, आधारकार्ड पाहिले जाते. त्यामुळे चुकीचे निकष लावून परवाना रद्द केला होता, असा दावाही हिंगे यांनी केला.
मंजुरी नागझरीची, छावणी बेलखंडीत
बेलखंडी येथील केशर दूध उत्पादक सहकारी संस्थेला नागझरी येथे छावणी मंजूर आहे. प्रत्यक्षात बेलखंडी येथे छावणी सुरू आहे. याबाबत बुधवारी सरपंच वैशाली पाव्हणे, उपसरपंच मदूबाई माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.