८२ टक्के वाहनधारकांचा हेल्मेट सक्तीला विरोध...
By Admin | Updated: July 23, 2016 01:00 IST2016-07-23T00:41:39+5:302016-07-23T01:00:59+5:30
राजकुमार जोंधळे . लातूर रस्त्यांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने गुरुवारी विधानसभेत हेल्मेट सक्तीसाठी ‘हेल्मेट नाही,

८२ टक्के वाहनधारकांचा हेल्मेट सक्तीला विरोध...
राजकुमार जोंधळे . लातूर
रस्त्यांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने गुरुवारी विधानसभेत हेल्मेट सक्तीसाठी ‘हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही !’ अशी अजब घोषणा केल्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. लातूर शहरातील ८२ टक्के वाहनधारकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. तर या हेल्मेट सक्तीची अंमलबजावणीची पद्धत अयोग्य असल्याचे ८५ टक्के वाहनधारकांनी म्हटले असल्याचे ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
रस्त्यांवरील वाढती वाहनांची संख्या आणि वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे दिवसेंदिवस रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे. या अपघातांना रोखण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाकडून गुरुवारी एक अजब घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली. या घोषणेच्या आाणि होणाऱ्या अंमलबजावणीबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारी लातूर शहरातील वाहनधारक व नागरिकांशी चर्चा करून सर्वेक्षण केले. हेल्मेट सक्तीसाठी असा निर्णय ‘योग्य की अयोग्य’ असा प्रश्न उपस्थित केला. तर या प्रश्नावर ८२ टक्के लोकांनी ‘अयोग्य’ असे उत्तर दिले. तर ११ टक्के वाहनधारकांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. तर उर्वरित ७ टक्के वाहनधारक आणि नागरिक या निर्णयावर ‘तटस्थ’ राहणे पसंत केल्याचे समोर आले.
राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून राज्यभरात हेल्मेट सक्ती करण्यात आल्यानंतर वाहनधारकांतून हेल्मेट खरेदीसाठी आॅटोमोबाईल्सवर रांगा लागल्याचे चित्र अनेकदा दिसून आले आहे. अशावेळी वाहनधारकांना हेल्मेट विक्रीतून लुटण्याचा प्रकार अनेकदा व्यावसायिकांकडून झाल्याच्या तक्रारी वाहनधारकांनी ‘लोकमत’कडे मांडल्या.
४हेल्मेट सक्तीचा निर्णय योग्य आहे, मात्र त्याबाबतच्या अंमलबजावणीची पद्धत अयोग्य असून, हेल्मेट खरेदी करताना वाहनधारकांनी कुठली काळजी घ्यावी, त्याच्या ठराविक किंमती आणि दर्जाबाबत कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. अशावेळी निकृष्ट हेल्मेटचीही चलती बाजारात दाम दुपटीच्या किंमतीत दिसून येत असल्याचे वाहनधारक म्हणतात.
राज्य शासनाकडून हेल्मेट सक्तीबाबत करण्यात आलेल्या घोषणेनंतर वाहनधारकांतून नाराजीचा सूर असला तरी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनधारकांना हेल्मेट वापरणे आवश्यकच आहे. हेल्मेट वापरल्यामुळे आपला प्रवास सुरक्षित होतो. हेल्मेट वापरण्याचे फायदेच आहेत. त्यासाठी वाहनधारकांनी सक्तीची वाट पाहू नये, असे जिल्हा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट महत्त्वाचेच...
४रस्त्यांवरून प्रवास करीत असताना प्रत्येक दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. हेल्मेटमुळे आपला प्रवास सुरक्षित होतो. यासाठी शासनाच्या हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची वाट पाहणे मुळात चुकीचे आहे. आपल्यासाठी आणि आपल्या सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येकाने हेल्मेट वापरले पाहिजे. हेल्मेटशिवाय पेट्रोल नाही, ही भूमिका चुकीची असल्याचे शफिक पठाण यांनी सांगितले.