जिल्ह्यात ८१ टक्के मतदान; आज मतमोजणी

By Admin | Updated: April 23, 2015 00:49 IST2015-04-23T00:42:43+5:302015-04-23T00:49:42+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यातील ३४६ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी काही ठिकाणी मतदान यंत्र बिघडण्याचा किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले

81 percent voting in the district; Counting Today | जिल्ह्यात ८१ टक्के मतदान; आज मतमोजणी

जिल्ह्यात ८१ टक्के मतदान; आज मतमोजणी


लातूर : लातूर जिल्ह्यातील ३४६ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी काही ठिकाणी मतदान यंत्र बिघडण्याचा किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला असून, मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. लातूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीची मतमोजणी बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन येथे होईल. दरम्यान, जळकोट तालुक्यातील कुणकी येथील एका प्रभागातील उमेदवाराचे नाव चुकल्याने गुरुवारी फेरमतदान घेण्यात येणार आहे.
लातूर जिल्ह्यातील ३४६ ग्रामपंचायतींसाठी ६ हजार १४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एकूण ११४२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. ५ लाख ५२ हजार ३३६ मतदारांना मतदानाचा हक्क होता. यातील सरासरी ८३ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान झाले. बुधवारी उन्हाचा पारा तीव्र होता. तरीही मतदारांनी रांगा लावून मतदान केले. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह होता. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८१ टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० ते १०.३० वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले होते. १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत २९ टक्के मतदान झाले. त्यानंतर पुन्हा मतदान वाढत गेले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. निवडणूक असलेल्या प्रत्येक गावांत पोलिस बंदोबस्त तैनात होता. दक्ष गावांत तर खास बंदोबस्त होता. जवळपास ५४ गावांना दक्ष गावे म्हणून जाहीर केले होते. त्यामुळे या गावांमध्ये बंदोबस्ताचे प्रमाण अधिक होते.
दरम्यान, जळकोट तालुक्यातील कुणकी येथील प्रभाग क्र. २ मध्ये ६१ मतदारांनी हक्क बजावला असताना एका उमेदवाराच्या अडनावात बदल झाल्याचे लक्षात आले. उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविला. जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे उमेदवारांच्या नावात चूक झाल्याचे सांगितले आणि फेरमतदानाची मागणी केली. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने फेर निवडणुकीची परवानगी दिली असून, २३ एप्रिल रोजी सकाळी कुणकी येथील प्रभाग क्र. २ मध्ये फेरमतदान होणार आहे. शोभा शिवाजी मगर या प्रभाग क्र. २ मधून सर्वसाधारण प्रभागातून निवडणूक लढवीत आहेत. मात्र मतपत्रिकेवर त्यांच्या नावात ‘शोभा शिवाजी पवार’ असे नाव छापून आले आहे. ‘मगर’ ऐवजी ‘पवार’ अडनाव छापून आले. त्यामुळे २३ एप्रिल रोजी या प्रभागात फेरमतदान होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 81 percent voting in the district; Counting Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.