सेनगाव तालुक्यातील ८० गावांचा २० तास वीजपुरवठा खंडित
By Admin | Updated: July 5, 2014 00:43 IST2014-07-04T23:48:36+5:302014-07-05T00:43:58+5:30
सेनगाव : तालुक्यातील ८० गावांचा वीजपुरवठा गुरूवारी सायंकाळपासून तांत्रिक बिघाडाच्या कारणावरून तब्बल २० तास खंडित झाला होता.

सेनगाव तालुक्यातील ८० गावांचा २० तास वीजपुरवठा खंडित
सेनगाव : तालुक्यातील ८० गावांचा वीजपुरवठा गुरूवारी सायंकाळपासून तांत्रिक बिघाडाच्या कारणावरून तब्बल २० तास खंडित झाला होता. वादळी पावसात हिंगोली-सेनगाव दरम्यान, वीज वाहिनीत बिघाड झाल्याने सेनगावसह ८० गावांतील ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली.
तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेचा कारभार मागील काही महिन्यांपासून कोलमोडला आहे. अल्पश: वाऱ्यासह झालेल्या पावसात हिंगोली- सेनगाव या विद्युतवाहिनी दरम्यान सातत्याने बिघाड होत असल्याने जवळपास संपूर्ण तालुक्यातच वीजपुरवठा खंडित होत आहे. हा प्रकार नित्याचाच झाला असून वीज वितरण कंपनी या महत्वाच्या वितरण व्यवस्थेची कोणतीही दुरूस्ती करीत नसल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे.
गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हिंगोली - सेनगाव विद्युत वाहिनीवर तांत्रिक विघाड झाल्याने तालुक्यातील सेनगाव, पुसेगाव, हत्ता, पानकनेरगाव या ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ८० गावांचा वीजपुरवठा रात्रभर खंडित झाला होता.
रात्रभर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तांत्रिक बिघाड शोधात होते; परंतु शुक्रवार दुपारपर्यंत बिघाड सापडलाच नसल्याने तब्बल २० तासाहून अधिक काळ सेनगावसह तालुक्यातील प्रमुख गावांचा वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान पूर्ववत सुरू झाला. तब्बल २० तास वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली. वीज कंपनीच्या दुर्लक्षपणाच्या कारभाराचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला. (वार्ताहर)