८० लाखांचा 'खड्डा'
By Admin | Updated: September 2, 2014 01:53 IST2014-09-02T00:17:33+5:302014-09-02T01:53:23+5:30
बीड : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बार्शी रोडवरील बिंदूसरा नदीच्या पुलावर ऐन मधोमध खड्डा पडला आहे़ त्यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे़

८० लाखांचा 'खड्डा'
बीड : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बार्शी रोडवरील बिंदूसरा नदीच्या पुलावर ऐन मधोमध खड्डा पडला आहे़ त्यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे़ महामार्ग विभागाच्या वतीने तीन महिन्यापूर्वीच सुमारे ८० लाख रूपये खर्च करून या पुलाचे काम करण्यात आलेले आहे़ मात्र पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाल्याने महामार्ग विभागाचे पितळ उघडे पडले आहे़
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे़ या पावसाने सर्व रस्ते जलमय झाले असून ठिकठिकाणच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे़ परिणामी खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्याचा आकार वाढत आहे़ बार्शी रोडवरील पुलावर देखील अशाच प्रकारचा खड्डा पडला़ त्यात पाणी साचल्याने हा खड्डा खचला आहे़ त्यावरील खडी व डांबर वाहून गेले असून गज उघडे पडले आहेत़ परिणामी वाहनचालकांना खड्डा चुकवून वाट काढावी लागते़ त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे़
दरम्यान, तीन महिन्यापूर्वीच या पुलाच्या दुरूस्तीचे काम करण्यात आलेले होते़ त्यासाठी ८० लाख रूपये खर्च करण्यात आले होते़ इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करूनही पुन्हा एकदा खड्डा पडल्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे़
सोमवारी या खड्ड्यामुळे पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ शहरातील हा महत्वाचा पूल आहे़ महामार्गावर कायम वाहतुकीची वर्दळ असते़ अशा परिस्थितीत हा पूल खड्ड्यामुळे धोकादायक बनला आहे़
वर्षभरापूर्वीही पडला होता खड्डा
बार्शी रस्त्यावरील पुलावर वर्षभरापूर्वी देखील अशाच प्रकारे खड्डा पडला होता़ प्रत्येक वर्षी या खड्ड्याची डागडुजी केली जाते़ त्यावर लाखोंचा निधीचा चुराडा केला जातो़ मात्र पुन्हा खड्डा पडत असल्याने या कामाचा दर्जा तपासला जातो की नाही असा सवाल मनविसेचे शैलेश जाधव यांनी केला आहे़ डागडुजीच्या नावाखाली महामार्ग विभागाच्या तिजोरीला खड्डा पडत आहे़ गुत्तेदारांना पोसण्यासाठीच निकृष्ठ काम करूनही दुर्लक्ष केले जाते, असा आरोपही त्यांनी केला़ दुरूस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी त्यांनी केली़ (प्रतिनिधी)