जिल्ह्यात दिवसाला ८ हजार लिटर्स दुधाची घट
By Admin | Updated: February 2, 2016 00:27 IST2016-02-02T00:17:48+5:302016-02-02T00:27:46+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर दुष्काळी परिस्थितीमुळे पशूधनास चारा मिळत नसल्याने दूध उत्पादनात यंदा मोठी घट झाली आहे़ दरवर्षी उन्हाळ्यात घट होते़ परंतु, पावसाळ्यापासूनच घट आहे़

जिल्ह्यात दिवसाला ८ हजार लिटर्स दुधाची घट
बाळासाहेब जाधव , लातूर
दुष्काळी परिस्थितीमुळे पशूधनास चारा मिळत नसल्याने दूध उत्पादनात यंदा मोठी घट झाली आहे़ दरवर्षी उन्हाळ्यात घट होते़ परंतु, पावसाळ्यापासूनच घट आहे़ लातूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांच्या तुलनेत सध्या दिवसाला ८ हजार लिटर्सची घट होत आहे़ त्यामुळे यातील कालावधीत चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने दूध उत्पादकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे़
लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान होत असल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे़ ७ लाख ६४ हजार पशुधनासाठी ४ लाख ५० हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे हा ही चारा अपुरा पडत असल्याने दूध उत्पादकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे़ उपलब्ध चारा हा तीन महिने पुरेल एवढाच असल्याने आहे त्या चाऱ्यालाच पूरवणी करुन वापरण्याची वेळ दूध उत्पादकावर आली आहे़ २०१२-१३ मध्ये प्रतीदिन ४४ हजार ६१० लिटर्स दूधाचे उत्पादन प्रतीदिन होत होते़ २०१३-१४ मध्ये पर्जन्यमान बरे असल्याने ५२ हजार ४८० लिटर्स प्रतिदिन दूधाचे उत्पादन मिळू लागले़
२०१४-१५ मध्ये पुन्हा पर्जन्यमानात घट झाल्यामुळे प्रतीदिन दुध उत्पादनाचा आकडा ४७ हजार ६४८ लिटर्सवर आला आहे़ पुन्हा याही वर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने २०१५-१६ या चालू वर्षाच्या कालावधीत प्रतीदिन ३९ हजार २३६ लिटर्स दूध उत्पादन होत आहे़ गेल्या चार वर्षाच्या तुलनेत दिवसाकाठी ८ हजार लिटर्सची दूध उत्पादनात घट होत असल्याचे समोर आले आहे़ त्यातच तीन महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याने यापुढील कालावधीत दूध उत्पादनात आणखी घट होणार असल्याने शेतकरी व दूध उत्पादकातून चिंता व्यक्त केली जात आहे़