विम्यासाठी ८ दिवसांची मुदत
By Admin | Updated: July 24, 2014 00:30 IST2014-07-24T00:00:38+5:302014-07-24T00:30:14+5:30
हिंगोली : खरीप हंगामाच्या पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत उत्पादकांना देण्यात आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत उत्पादकांना कमी आणि उच्च जोखीमस्तरचा विमा काढता येणार आहे.
विम्यासाठी ८ दिवसांची मुदत
हिंगोली : खरीप हंगामाच्या पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत उत्पादकांना देण्यात आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत उत्पादकांना कमी आणि उच्च जोखीमस्तरचा विमा काढता येणार आहे. यंदाची विपरित परिस्थिती पाहता पीकविमा उत्पादकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
मागील वर्षीपेक्षा यंदा पावसाने ओढ दिली असतानाच खरीप हंगामाच्या अधिक उत्पादनाची हमी नाही. उशिरा पेरण्या झाल्याने उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठीचा पीकविमा उत्पादकांना लाभदायक ठरणार आहे. अधिक जोखीमस्तर आणि कमी जोखीमस्तर अशा दोन प्रकारांत उत्पादकांना हा विमा काढता येणार आहे. हा विमा बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना काढता येईल.
यंदा नैसर्र्गिक आपत्तींपासून अधिसूचित क्षेत्र पातळीवर विमा संरक्षण, राज्य शासनाद्वारे केलेल्या पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई, शिवाय चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदविले गेल्यास सुद्धा नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यात राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांना विमा हप्त्यात १० टक्के सबसिडी, विदर्भ पॅकेजमधील ६ जिल्ह्यात कापूस पिकासाठी अल्प अत्यल्प भूधारकांना ७५ टक्के सबसिडी, अल्प व अत्यल्प भूधारकांना इतर पिकांसाठी ५० टक्के सबसिडी देण्यात येणार आहे; परंतु त्यासाठी भात, ज्वारी, मका, नाचणी, उडीद, मूग, तूर, बाजरी, भुईमूग, काराळ, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल या पिकांना सर्वसाधारण हप्ता तर ऊस, कापूस व कांदा पिकास व्यापारी हप्ता भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव पत्रक भरून रोख विमा हप्त्यासह अंतिम मुदतीपूर्वी बँकेच्या शाखेत जमा करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राधेश्याम शर्मा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)