कोरोना बाधित ८ रुग्णांनी केले मतदान
By | Updated: December 3, 2020 04:10 IST2020-12-03T04:10:01+5:302020-12-03T04:10:01+5:30
औरंगाबाद : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. महापालिकेच्या वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या ८ पदवीधर ...

कोरोना बाधित ८ रुग्णांनी केले मतदान
औरंगाबाद : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. महापालिकेच्या वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या ८ पदवीधर रुग्णांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. रुग्णांना मतदान केंद्रापर्यंत नेणे आणि आणण्यासाठी आरोग्य विभागाने उत्तम व्यवस्था केली होती हे विशेष.
महापालिकेच्या वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये ४०० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील किती रुग्ण मतदार आहेत याची माहिती महापालिकेने मागील तीन दिवसांपूर्वी घेतली. पदवीधर २३ रुग्ण उपचार घेत असल्याचे समोर आले. त्या सर्वांना मतदानासाठी व्यवस्था केल्याची सूचना सुद्धा देण्यात आली. त्यातील ८ रुग्णांनी मतदान करण्याची तयारी दर्शविली. रुग्णांच्या मतदानासाठी सायंकाळी चार ते पाच अशी वेळ निश्चित करण्यात आली. किलेअर्क कोविड सेंटरमधील १ रुग्ण गंगापुरातील होता. त्यास मतदानासाठी गंगापूरला नेण्यात आले. मतदान करून रुग्ण परत सायंकाळी सेंटरमध्ये दाखल झाला.
शहरी भागातील मतदारांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नियोजन केले होते. दुपारी ४ वाजता रुग्णाला सुरक्षेसह मतदान केंद्रावर नेऊन मतदान करून घेण्यात आले. यात सिपेट -१, एमआयटी -३ , पदमपुरा कोविड सेंटर -१, पीईएस कोविड सेंटर -१ व किलेअर्क कोविड सेंटर येथून १ अशा ८ पदवीधर कोरोना रुग्णांनी मतदानाचा हक्क बजावला. हे नियोजन आरोग्य अधिकारी डॉ. तलत अझीझ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. प्रोग्राम अधिकारी म्हणून डॉ. अर्चना राणे, डॉ. पाथ्रीकर यांचा सहभाग होता.
मतदान केंद्रांची निर्जंतुकीकरण
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मतदान केंद्रांवर २५३ आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी निर्जंतुकीकरणाचे काम पूर्ण केले. यात ११८ आरोग्य कर्मचारी, २२ आरोग्य अधिकारी, मतदान केंद्र मलेरिया विभागाचे ११३ कर्मचारी उपस्थित होते.