८९२ शेतकऱ्यांची तुती लागवडीसाठी नोंदणी..!
By Admin | Updated: May 19, 2017 00:27 IST2017-05-19T00:24:02+5:302017-05-19T00:27:57+5:30
जालना :यंदा खरीप हंगामात तुती लागवड करण्यासाठी ८९२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.

८९२ शेतकऱ्यांची तुती लागवडीसाठी नोंदणी..!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकांसाठी केलेला खर्च व मिळणारे उत्पन्न पाहता शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. या दोन नगदी पिकांना पर्याय म्हणून यंदा खरीप हंगामात तुती लागवड करण्यासाठी ८९२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.
गत काही वर्षांत जिल्ह्यात तुती लागवडीने मराठवाड्यात आघाडी घेतली आहे. लागवड व उत्पन्न पाहता येथे रेशिम मार्केट होऊ घातले आहे. याचा भागात म्हणून जिल्ह्यात हे क्षेत्र दोन हजार हेक्टरने वाढणार असल्याचा अंदाज रेशिम विभागाने व्यक्त केला. तुती लागवडीसाठी आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया करावी लागते. बँक खाते क्रमांक, आधारकार्ड व सातबारा आदी कागदपत्रे आॅनलाईन आल्यावर संबंधित शेतकऱ्यांचे लॉगईन अकाऊंट काढले जाते. मनरेगा अंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी तीन वर्षांसाठी २ लाख ९२ हजारांचे अनुदान देण्यात येते. तुती लागवड, प्रक्रिया व मजुरीसाठी हे अनुदान देण्यात येते.
रेशीम विभागाचे प्रादेशिक संचालक दिलीप हाके म्हणाले, यंदा जालना जिल्ह्यात सुमारे ८९२ शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. रेशिम मार्केट होत असल्याने तुतीचे क्षेत्र सुमारे दोन हजार एकर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कॅशक्रॉप म्हणून आता तुतीचे पीक पुढे येत आहे. खरीप हंगामात अनेक शेतकरी तुती लागवडीला प्राधान्य देत आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.