औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीत बुधवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मंगळवारी एसटी बसेससह ७७९ वाहनांद्वारे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले.मतदान केंद्रांवर मतदानाच्या एक दिवसापूर्वी मतदान यंत्रे, मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साधन सामग्री आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोहोचविण्यासाठी एसटी बसेस आणि अन्य वाहनांचे नियोजन करण्यात आले होते. राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील प्रत्येक आगारातून मंगळवारी यासाठी एसटी बसेस पाठविण्यात आल्या. ज्या मतदान केंद्रांवर बस, ट्रक, टेम्पो अशी वाहने पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी जीप, कार, क्रुझर, मिनीबस यासारख्या छोट्या वाहनांद्वारे मतदान साहित्याची वाहतूक करण्यात आली. निवडणूक साहित्य घेऊन रवाना झालेल्या एसटी बसेस दुपारनंतर आगारात परतल्या. मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी एसटी बस, जीप, क्रुझर यासारखी विविध ७७९ वाहने रवाना झाल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
मतदान साहित्य घेऊन ७७९ वाहनांचा ताफा रवाना
By admin | Updated: October 15, 2014 00:47 IST