पदवीधरसाठी ७६ केंदे्र; आज मतदान
By Admin | Updated: June 20, 2014 00:46 IST2014-06-20T00:02:28+5:302014-06-20T00:46:54+5:30
लातूर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान घेण्यात येत आहे.

पदवीधरसाठी ७६ केंदे्र; आज मतदान
लातूर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीत तब्बल २३ उमेदवार रिंगणात राहिले असून, लातूर जिल्ह्यात मतदानासाठी ७६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी थंडावली असून, शुक्रवारी रिंगणातील २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाभरात ७६ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी ७ मतदान केंद्र वाढविण्यात आले आहेत. २००८ च्या निवडणुकीत जिल्ह्यात ४० हजार ७५१ मतदार होते. त्यात यावेळी साडेअकरा हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. एकूण ५२ हजार २३२ पदवीधरांना यावेळी मतदानाचा हक्क बजावता येईल. त्यापैकी ७ हजार ६४ स्त्री मतदार आहेत. तुलनेने पुरुष मतदारांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात ४५ हजार १६८ पुरुष मतदार आहेत. मतदारांना बॅलेट पेपर पुरविण्यात येणार असून, त्यावर स्केच पेनद्वारे पसंती क्रमांक दर्शवायचा आहे. २० जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे.
मतदारांना मतदारयादीत आपले नाव शोधण्यासाठी आॅनलाईन सर्च इंजिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. लातूर.एनआयसी.इन या संकेतस्थळावर जाऊन यादीतील नाव शोधता येईल. तसेच आपला यादीतील क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता याबाबीही आॅनलाईन जाणून घेता येतील. इतकेच नव्हे तर पोलचिट सुद्धा प्रशासनाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येत आहे. मतदारांनी अडचणीसंदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी खपले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा काम पाहत आहेत.