बजाज आॅटो कंपनीकडून ७५ टक्के पाण्याची बचत
By Admin | Updated: May 12, 2016 00:54 IST2016-05-12T00:12:19+5:302016-05-12T00:54:36+5:30
औरंगाबाद : भीषण टंचाई परिस्थितीत विविध उपाययोजनांचा वापर करून वाळूजच्या बजाज आॅटोने पाण्याच्या वापरात लक्षणीय घट केली आहे.

बजाज आॅटो कंपनीकडून ७५ टक्के पाण्याची बचत
औरंगाबाद : भीषण टंचाई परिस्थितीत विविध उपाययोजनांचा वापर करून वाळूजच्या बजाज आॅटोने पाण्याच्या वापरात लक्षणीय घट केली आहे. उत्पादनात सातत्याने वाढ होत असताना २०११-१२ च्या तुलनेत २०१५-१६ यावर्षी ७५ टक्के पाण्याची बचत करून बजाज आॅटोने मराठवाड्यातील उद्योगांसमोर अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
सलग चौथ्या वर्षी मराठवाडा भीषण दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. उद्योगांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या जायकवाडी धरणातील जिवंत साठा केव्हाच संपला आहे. मृतसाठ्यातून आतापर्यंत १६ कोटी घनमीटर पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. यावरून भीषण टंचाईची कल्पना येते. या पार्श्वभूमीवर बजाज आॅटोने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत केली आहे. २०११-१२ या वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ मध्ये पाण्याचा वापर एकतृतीयांशपेक्षाही कमी झाला असल्याचे बजाज आॅटोचे उपाध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) डी. एन. नार्वेकर यांनी सांगितले.
अशी केली बचत
पाण्याची बचत करण्यासाठी बजाज आॅटोने विविध उपक्रम हाती घेतले.
1 पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाच्या पाण्याचे फेरभरण करणारी यंत्रणा कंपनीत उभारण्यात आली. कंपनीत पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविले जात आहे.
2 वापरलेल्या शंभर टक्के पाण्यावर ‘आरओ प्लँट’मध्ये प्रक्रिया करून कारखान्यातील विविध कामांसाठी त्याचा वापर करण्यात आला.
3 सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर ‘टॉयलेट’ तसेच बगिच्यांसाठी केला जात आहे.
4 पाण्याच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच पाण्याचा काटकसरीने वापर होतो की नाही, हे पाहण्यासाठी कंपनीत पाण्याचे मीटर बसविण्यात आले आहेत.
5 जमिनीखालील अशुद्ध पाण्याच्या पाईपलाईन तसेच फायर हायड्रंट लाईन्स गंजू नयेत तसेच त्यातून पाण्याची गळती होऊ नये, यासाठी या पाईपलाईन्स बदलून त्या जमिनीवरून टाकण्यात आल्या आहेत.
‘सीआयआय’तर्फे तीन पुरस्कार
सकारात्मक पद्धतीने पाण्याचा वापर करणारा उद्योग म्हणून वाळूजच्या बजाज आॅटोची ओळख आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केल्याबद्दल कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीजने (सीआयआय) बजाज आॅटोचा ‘एक्सलन्स वॉटर इफिशियन्ट युनिट’ म्हणून तीन वेळा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
पाणी बचतीसाठी
व्यापक प्रयत्न हवेत
मराठवाडा भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत बजाज आॅटोने पाण्याचा कमीत कमी वापर करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे पाणी वापरात ७५ टक्के बचत झाली आहे. टंचाईवर मात करण्यासाठी इतर उद्योगांनीही नवनवीन कल्पना राबवून पाणी बचतीसाठी प्रयत्न करावेत.
- डी. एन. नार्वेकर, उपाध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग), बजाज आॅटो
पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे सध्याच्या परिस्थितीत नितांत गरज आहे. पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. पाणी बचतीसाठी तुम्ही नवनवीन कल्पना राबवीत असाल, तर आपले अनुभव आम्हाला ९८८१३००४९४, ९८८११९७३९८ या क्रमांकावर कळवावेत.