आक्षेपार्ह मजकुराकडे ७५ टक्के युजर्सचा कानाडोळा

By Admin | Updated: June 15, 2014 00:58 IST2014-06-15T00:28:35+5:302014-06-15T00:58:46+5:30

प्रतिनिधी , उस्मानाबाद इंटरनेटची उपलब्धता आणि छोट्या-मोठ्यांच्या हातात अगदी सहजपणे उपलब्ध झालेले स्मार्टफोन यामुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

75 percent of the users of the objectionable text | आक्षेपार्ह मजकुराकडे ७५ टक्के युजर्सचा कानाडोळा

आक्षेपार्ह मजकुराकडे ७५ टक्के युजर्सचा कानाडोळा

प्रतिनिधी , उस्मानाबाद
इंटरनेटची उपलब्धता आणि छोट्या-मोठ्यांच्या हातात अगदी सहजपणे उपलब्ध झालेले स्मार्टफोन यामुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र, हा वापर सकारात्मक दृष्टिकोनातून होत नसल्याचेच ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. सोशलमिडीयाचा वापर करणारे तब्बल ७५ टक्के तरूण आक्षेपार्ह पोस्टकडे कानाडोळा करीत असल्याचे पुढे आले असून, सुमारे ५८ टक्के तरूणांना सायबर क्राईमबाबत कसलीही माहिती नसल्याचे हे सर्वेक्षण सांगते.
सोशल मीडियाची निर्मिती मुळातच सकारात्मक दृष्टिकोनातून झाली आहे. या माध्यमातून शिक्षण व रोजगाराबाबतची माहिती मिळावी. याबरोबरच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांकडून मार्गदर्शन प्राप्त करून घेता यावे, आदी बाबी अपेक्षित आहेत. मात्र, याऐवजी सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी होत असल्याचे दिसून येते. त्याही पुढे जाऊन हे माध्यम एकमेकांवर टीका-टिप्पण्णी करण्यासाठी वापरले जात असल्याचे मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत १८ ते २७ या वयोगटातील सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले असता अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.
एखादी आक्षेपार्ह पोस्ट समाजामध्ये किती विध्वंस निर्माण करू शकते, याचा प्रत्यय उभ्या महाराष्ट्राने मागील काही दिवसांत घेतला आहे. मात्र, त्यानंतरही सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या तरूणांमध्ये जागरूकता आलेली नसल्याचेच दिसून येते. एखादी आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास आपण काय करता, असा प्रश्न ‘लोकमत’ने या तरूणांना विचारला होता. यावर २० टक्के तरूणांनी सदर पोस्ट डिलीट करतो, असे म्हटले असून, ५ टक्के तरूणांनी याबाबत आपण पोलिसांना माहिती देत असल्याचे या सर्वेक्षणावेळी नमूद केले.
विशेष म्हणजे, तब्बल ७५ टक्के तरूण अशा आक्षेपार्ह पोस्टकडे कानाडोळा करणे पसंद करीत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. महत्त्वाचे म्हणजे, फेसबूक, वॉट्सअ‍ॅप तसेच इतर सोशल मीडियाचा हिरीरीने वापर करणाऱ्या सुमारे ५८ टक्के तरूणांना सायबर क्राईमबाबत मात्र कसलीही माहिती नसल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. ४० टक्के तरूणांनी काही प्रमाणात या कायद्याबाबत माहिती असल्याचे नमूद केले
असले तरी अवघ्या दोन टक्के तरूणांनीच आपल्याला सायबर क्राईमची परिपूर्ण माहिती असल्याचे सांगितले आहे.
सायबर क्राईम रोखण्यासंदर्भात असलेले कायदे पुरेसे सक्षम नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. हीच बाब या तरुणांनीही या सर्वेक्षणाद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. सर्वेक्षण केलेल्यांपैकी तब्बल ७० टक्के तरूणांनी सायबर क्राईम रोखण्यासाठी असलेले कायदे पुरेसे नसल्याचे म्हटले असून, २५ टक्के तरूणांनी याबाबत सांगता येत नाही, असे नमूद केले आहे. तर केवळ पाच टक्के तरूणांच्या मते सायबर क्राईम रोखण्यासंदर्भात अस्तित्वात असलेले कायदे सक्षम आहेत.
दुरूपयोग करणाऱ्यांना मिळावी तात्काळ शिक्षा
सोशल नेटवर्र्कींग साईट्सचा वापर करताना अनेकजण आक्षेपार्ह पोस्ट टाकून सामाजिक तणाव वाढवित असल्याचे दिसून येते. हा प्रकार रोखण्यासाठी सोशल मीडियाचा दुरूपयोग करणाऱ्यांना तात्काळ शिक्षा करणे गरजेचे असल्याचे अनेक तरूणांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत व्ही. ए. गोफणे म्हणाले की, सोशल मीडियामुळे संपूर्ण समाज वेठीला धरला जातो. अशा वेळी सदर प्रकार करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. तरच हे प्रकार रोखणे शक्य होईल. सोशल नेटवर्कच्या वापराबाबतचे नियम अधिक कडक करण्याची आवश्यकता राजश्री भिसे हिने व्यक्त केली आहे.
या माध्यमाचा वापर अधिक काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता असून, सोशल मीडियाचे खाते उघडताना आयडी प्रुफ बंधनकारक केल्यास अनेक कटू प्रसंग टाळता येतील, असे म्हटले आहे. कायदे कडक केलेच पाहिजे, त्याच बरोबर या माध्यमाच्या वापराबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असून, या माध्यमाचा असाच दुरूपयोग होत राहिल्यास चीनप्रमाणे आपल्या देशातही बंद आणावी, असे मत ए. आर. नवले यांनी व्यक्त केले आहे. सोशल मीडिया हे ज्ञानाचे माध्यम झाले पाहिजे. मात्र, दुर्देवाने त्याचा जातीय तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी वापर होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने या माध्यमाचा वापर करताना अधिक काळजी घ्यायला हवी. याबरोबरच सोशल नेटवर्क चालविणाऱ्यांना मार्गदर्शक तत्वे घालून देण्याची गरज दिनेश लोमटे यांनी व्यक्त केली आहे.
या माध्यमाच्या सकारात्मक वापरासाठी कडक कायद्याची आवश्यकता अमर सोनवणे यांनी व्यक्त केली असून, या माध्यमावर शासनानेही नियंत्रण राखण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. सोशल नेटवर्किंग ही आधुनिक काळातील जीवनपध्दती असल्याचे सांगत ती बंद करता येणार नाही. मात्र, तिचा वापर सुसंस्कारित पध्दतीने करण्यासाठी समाजाबरोबरच शासनानेही पुढाकार घेण्याची आवश्यकता एल. व्ही. पवार यांनी व्यक्त केली आहे.
के. बी. शेख यांनी या माध्यमावर अंकुश आणण्यासाठी काही मुद्दे सूचविले आहेत. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान अठरा वर्षावरील असावे, असे सांगतानाच अकाऊंट ओपन करताना ओळखपत्र व इतर कागदपत्रे घ्यायला हवीत. याबरोबरच अकाऊंट ओपन झाल्यावर सदर फोटो तसेच कागदपत्रामध्ये उपलब्ध असलेली माहितीच लिंकद्वारे प्रोफाईलवर अपलोड झाली पाहिजे. असे झाल्यास सायबर क्राईम रोखण्यात यश येईल, असा विश्वासही शेख यांनी व्यक्त केला आहे.
लाईक देताना हात आखडता
सोशल मीडियावरती दिवस-रात्र विविध प्रकारच्या पोस्टचा रतीब सुरू असतो. यातील अनेक पोस्ट विविध अंगाने फेसबुक युसर्जना आकर्षित करणाऱ्या असतात. मात्र, यावर प्रतिक्रिया नोंदविताना अथवा लाईक देताना तरूणाई हात आखडता घेत असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येते. आलेल्या प्रत्येक पोस्टवर आपण प्रतिक्रिया अथवा लाईक देत नाही, असे साठ टक्के तरूणांनी म्हटले आहे. तर ३८ टक्के तरूणांनी ठराविक पोस्टला लाईक देतो, असे सांगितले असून, केवळ दोन टक्के तरूण प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया अथवा लाईक देतात, असेही हा सर्वे सांगतो. एकप्रकारे फेसवबुकवरील पोस्टबाबत आपण गंभीर असल्याचेच या तरूणांनी या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

Web Title: 75 percent of the users of the objectionable text

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.