‘स्पॉट अॅडमिशन’नंतरही ७५ टक्के जागा रिक्तच
By Admin | Updated: August 17, 2015 00:08 IST2015-08-17T00:08:38+5:302015-08-17T00:08:38+5:30
परभणी : डी़एल़एड्च्या राज्यस्तरीय प्रवेश फेरीत भावी गुरूजींनी पाठ फिरविल्याने संस्थाचालकाच्या आग्रहास्तव जिल्हास्तरावर तीन दिवसीय ‘स्पॉट अॅडमिशन’ फेरी ठेवण्यात आली होती़

‘स्पॉट अॅडमिशन’नंतरही ७५ टक्के जागा रिक्तच
परभणी : डी़एल़एड्च्या राज्यस्तरीय प्रवेश फेरीत भावी गुरूजींनी पाठ फिरविल्याने संस्थाचालकाच्या आग्रहास्तव जिल्हास्तरावर तीन दिवसीय ‘स्पॉट अॅडमिशन’ फेरी ठेवण्यात आली होती़ परंतु, या फेरीकडेही भावी गुरूजींनी पाठ फिरविल्याने तब्बल ७५ टक्के जागा रिक्त राहणार आहेत़ त्यामुळे पुन्हा स्पॉट अॅडमिशन फेरी ठेवण्यासाठी संस्थाचालक संचलनालयात ठाण मांडून बसले आहेत़
काही वर्षापूर्वी झटपट नोकरी मिळवून देणारा अभ्यासक्रम म्हणून डी़एड्. ला विद्यार्थ्यांची पसंती होती़ त्यामुळे या अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा होत होती़ तसेच प्रवेशाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने डी़एड्. कॉलेजच्या संखेत भरमसाठ वाढ झाली़ त्यामुळे भावी शिक्षकांची संख्या लाखांच्या घरात गेली़ परंतु, २ मे २०१० नंतर शिक्षक भरतीवर निर्बंध घातल्याने या क्षेत्राकडे विद्यार्थ्यानी पाठ फिरवली आहे़ यावर्षी तर जिल्ह्यातील तब्बल ७५ टक्के जागा रिक्त राहणार आहेत.़ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे १ अनुदानित २२ कायम विनाअनुदानित अशी २३ अध्यापक विद्यालये आहेत़ तर एकूण १ हजार ५०० प्रवेश क्षमता आहे़ राज्यस्तरीय प्रवेश फेरीसाठी यावर्षी १ जून ते १५ जून अर्ज विक्री व स्वीकृतीचा कालावधी होता़
यामध्ये केवळ १८५ विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी प्रवेश अर्ज दाखल केले होते़ २९ जूनच्या प्रवेश फेरीमधून जिल्ह्यातील ११ विद्यालयांमध्ये ५९ भावी शिक्षकांनी प्रवेश घेतला तर ११ विद्यालयांना एकही भावी शिक्षक मिळाला नव्हता़ त्यामुळे आपली अध्यापक विद्यालये बंद पडतील या भीतीने संस्थाचालकांनी आपले वजन वापरून २२ ते २४ जुलै दरम्यान ‘स्पॉट अॅडमिशन’ ठेवण्यास भाग पाडले़ परंतु, प्रयत्न करूनही अनेक भावी शिक्षक या अभ्यासक्रमाकडे फिरकले नाहीत़ विषेश म्हणजे, अध्यापक विद्यालयातील सर्वच शिक्षकांना विद्यार्थ्यांचे टार्गेट दिले होते़ तरही स्पॉट अॅडमिशन फेरीमध्ये केवळ २२१ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला़ त्यामुळे जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयाची प्रवेश क्षमता जवळपास १ हजार ५०० असताना प्रत्यक्षात मात्र राज्यस्तरीय प्रवेश व स्पॉट अॅडमिशन फेरीमधील मिळून केवळ २८० जणांनीच प्रवेश घेतला. त्यामुळे १ हजार २२० जागा रिक्त राहणार आहेत़
या प्रवेश फेरीमध्ये प्रत्येक अध्यापक विद्यालयास नावालाच भावी शिक्षक मिळाल्याने प्रत्यक्षात अध्यापन होणार की कागदोपत्री अध्यापक विद्यालये चालणार हे येणारा काळच ठरवणार आहे़ सध्या तरी अजून संस्थाचालकांना विद्यार्थी मिळतील या आशेने पूणे येथील शिक्षण संचलनालयात पून्हा स्पॉट अॅडमिशन प्रवेश फेरीसाठी कालावधी देण्यात यावा, यासाठी संस्थाचालक तळ ठोकून आहेत़