१७ वर्षात भूकंपाचे ७४ सौम्य धक्के
By Admin | Updated: November 6, 2016 00:42 IST2016-11-06T00:40:35+5:302016-11-06T00:42:27+5:30
लातूर १९९३ पासून भूकंपाच्या धक्क्याची मालिका सुरू असून गेल्या दीड वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा २ रिश्टर स्केलचा सौम्य धक्का बसला आहे़

१७ वर्षात भूकंपाचे ७४ सौम्य धक्के
हणमंत गायकवाड लातूर
१९९३ पासून भूकंपाच्या धक्क्याची मालिका सुरू असून गेल्या दीड वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा २ रिश्टर स्केलचा सौम्य धक्का बसला आहे़ १९९९ ते २०१६ या कालावधीत एकूण ७४ भूकंपाचे सौम्य धक्के बसले असून १९९३ ते १९९९ या सात वर्षातील भूकंपाची नोंदी मात्र भूकंपमापक कार्यालयात ठेवलेल्या नाहीत़ विशेष म्हणजे १९९३ ते ९९ या कालावधीत अनेक सौम्य धक्के किल्लारी व सास्तूर परिसराने पचविले आहेत़ मात्र त्याच्या नोंदी मापन कार्यालयात ठेवल्या गेल्या नाहीत़
१९९३च्या प्रलयंकारी भूकंपाने औसा तालुक्यातील किल्लारी, माकणी, सास्तूर परिसरात हाहाकार माजविला होता़ हजारो लोकांचा जीव या भूकंपाने घेतला़ सरकार व सामाजिक संस्थानी या भागात मदत कार्य करून लोकांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला़ तेव्हापासून भूकंपाच्या धक्क्याची मालिका सुरूच आहे़ ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेला भूकंप ६़३ रिश्टर स्केलचा होता़ १९९३ नंतर पुढील सात वर्षे भूकंपाचे अनेक सौम्य धक्के बसले़ मात्र त्याची नोंद भूकंप मापक कार्यालयात ठेवली गेली नाही़ १९९९ पासून झालेल्या भूकंपाच्या नोंदी या कार्यालयात ठेवल्या आहेत़ या नोंदीनुसार १९९९ ते २०१६ या कालावधीत ७४ भूकंपाचे धक्के बसले आहेत़ ४० ते ५० किलोमीटरच्या परिघात या भूकंपाचे धक्के बसले आहेत़ १३ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ९़१९ वाजता २़४ रिश्टर स्केलचा धक्का किल्लारी परिसराला बसला होता़ याचा परीघ ४२ किमीचा असून, तब्बल दीड वर्षानंतर २ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी २़४१ वाजता २ रिश्टर स्केलचा सौम्य धक्का बसला असल्याचे वैज्ञानिक सहाय्यक सुधीर हरहरे यांनी सांगितले़