दुधना प्रकल्पात ७३ टक्के साठा

By Admin | Updated: September 5, 2014 00:13 IST2014-09-04T23:49:17+5:302014-09-05T00:13:38+5:30

मोहन बोराडे, सेलू निम्न दुधना प्रकल्पात प्रथमच ७३ टक्के जलसाठा झाल्यामुळे सेलू शहरासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

73 percent in milk production | दुधना प्रकल्पात ७३ टक्के साठा

दुधना प्रकल्पात ७३ टक्के साठा

मोहन बोराडे, सेलू
निम्न दुधना प्रकल्पात प्रथमच ७३ टक्के जलसाठा झाल्यामुळे सेलू शहरासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ३१ आॅगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
दुधना प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाल्यामुळे सेलू शहराचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पात केवळ ४१ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पात पाण्याचा ओघ वेगाने झाला. परिणामी ४ सप्टेंबर रोजी प्रकल्पात २५१ दलघमी पाणीसाठा आहे. त्यात १४८ दलघमी जीवंत पाणीसाठा आहे.
तीनच दिवसांत प्रकल्पाच्या पाणीपातळीत जवळपास दुपटीनेच वाढ झाली असल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातील पाण्याचा आगामी काळात सिंचनासाठी देखील वापर होण्याची शक्यता होणार आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून शहराला मिळते. प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाल्यामुळे सेलू शहरवासिय सुखावले आहेत.
प्रकल्पाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याची तयारी करण्यात आली आहे. आणखी पावसाळ्याचा एक महिना असल्यामुळे टप्याटप्याने पाणीसाठा करण्यात येत आहे.
पाणीपातळीत झपाट्याने वाढ
निम्न दुधना प्रकल्पाच्या निर्मितीनंतर प्रथमच ७३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही प्रकल्पात ६१ टक्के जलसाठा होता. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रकल्पात केवळ ४१ टक्के पाणी होते. परंतु, तीन दिवसांच्या पावसामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे यावर्षी सिंचनाला पाणी मिळण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान डाव्या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर उजव्या कालव्याचीही काही कि.मी. अंतराची पाणी सोडून चाचणीही झाली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: 73 percent in milk production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.