७२ कुपोषित बालकांना जीवदान
By Admin | Updated: August 7, 2014 02:04 IST2014-08-07T01:49:45+5:302014-08-07T02:04:13+5:30
उमरगा : कौटुंबिक दारिद्र्य अंधश्रद्धा, निरक्षरता, नियोजनाचा अभाव, यासह आदी विविध कारणामुळे बालकांच्या कुपोषणात मोठी वाढ होत असली तरी,

७२ कुपोषित बालकांना जीवदान
उमरगा : कौटुंबिक दारिद्र्य अंधश्रद्धा, निरक्षरता, नियोजनाचा अभाव, यासह आदी विविध कारणामुळे बालकांच्या कुपोषणात मोठी वाढ होत असली तरी, शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आढळून आलेल्या ७२ कुपोषित बालकांना जीवदान देण्यात प्रशासनाला यश आले आहे.
कुपोषित बालकांचे आरोग्यमान उंचवावे, कुपोषित बालकांना सकस आहार देऊन त्यांचे वजन व उंची वाढविता यावी, यासाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सन २०१३-१४ पासून सर्वत्र राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत झिरो ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन विविध आजाराच्या तपासणीनंतर त्यांच्या आजारावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत तालुक्यातील २८२ अंगणवाड्यातील २२ हजार बालकाची तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणीत वयाप्रमाणे कमी उंची आणि कमी वयाची अति कुपोषित ७२ बालके आढळून आली आहेत. या बालकांवर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील बाल उपचार केंद्रात गेल्या एक महिन्यापासून पोषण आहार व वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
आढळून आलेल्या कुपोषित बालकांवर उपचार करण्यात यावे, यासाठी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र बाल उपचार केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या उपचार केंद्रातील बालकांसाठी स्वतंत्र कॉटस् मातांना राहण्यासाठी सुविधा, दोन वेळेस अमायलेस युक्त पिठाचा गोड व तिखट शिरा, दूध, केळी, उखडलेली अंडी, पालेभाज्या, डाळी, बटाटे आदीसह या कुपोषित बालकांना दिवसातून आठ वेळा पोषण आहार देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील सात बालके सुदुढ झाल्यानंतर २१ जुलै ते ११ आॅगस्ट या २१ दिवसाच्या कालावधीसाठी अन्य बालकांना येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या बालकांचे वजन वाढत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास जाधव, डॉ. महेश वडदरे यांनी सांगितले.