७२ गुंठ्याचा वाद बेतला शेतकर्याच्या जिवावर
By Admin | Updated: May 10, 2014 23:54 IST2014-05-10T23:15:57+5:302014-05-10T23:54:09+5:30
देवणी : तालुक्यातील गुरनाळ येथे जमिनीचा वादातून पिता-पुत्रावर भावकीतीलच लोकांनी प्राणघातक हल्ला करुन एकाचा बळी घेतला़

७२ गुंठ्याचा वाद बेतला शेतकर्याच्या जिवावर
देवणी : तालुक्यातील गुरनाळ येथे जमिनीचा वादातून पिता-पुत्रावर भावकीतीलच लोकांनी प्राणघातक हल्ला करुन एकाचा बळी घेतला़ ६ मे राजी घडलेली ही घटना ७२ गुंठे जमिनीच्या वादातून झाली असल्याचे आता तपासातून समोर आली आहे़ गुरनाळ येथील शिंदे कुटुंंबियांमध्ये जमिनीवरुन वाद सुरू होता़ त्यातच ५ मे रोजीच्या सायंकाळी झालेल्या वादळी वार्यात वादग्रस्त शेतातील एक बाभळीचे झाड पडले होते़ हे झाड तोडण्यावरुन ६ मे रोजी सकाळी गुंडू धोंडिबा शिंदे व मालुजी गुंडू शिंदे यांना आरोपी विनोद माणिकराव शिंदे, अमोल मच्छिंद्र शिंदे व इतर तिघांनी जबर मारहाण केली़ या घटनेत गुंडू शिंदे जागीच ठार झाले़ तर मालुजी शिंदे अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे़ याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे़ तपासादरम्यान, बाभळीचे झाड तोडण्याचे निमित्त ठरल्याचे स्पष्ट झाले़ आरोपी व मयताच्या कुटुंंबियांमध्ये जमिनीचा वाद सुरू होता़ मूळ कुरापत या वादाचीच असल्याचेही समोर आले आहे़ ही दोन्ही कुटुंबं ७२ गुंठे जमिनीसाठी भांडत होते़ मयत गुंडू शिंदे काही वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात तुरुंगात होते़ त्यावेळी ७२ गुंठ्याची जमीन आरोपींचे कुटुंब कसत होते़ गुंडू शिंदे परत आल्यानंतर या जमिनीवरुन दोन्ही कुटुंंबियांमध्ये वाद सुरू झाला़ या वादातूनच त्यांची हत्या झाली असल्याचे पोलिस निरीक्षक एस़एस़ आमले यांनी सांगितले़ दरम्यान, घटनेतील फरार असलेले उर्वरित तीन आरोपी लवकरच गजाआड होतील, असेही ते म्हणाले़