लेखापरीक्षण न करणा-या ७ हजार संस्थांची नोंदणी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:56 IST2017-10-06T00:56:25+5:302017-10-06T00:56:25+5:30
संस्थेचे नियमित लेखापरीक्षण न करणा-या जिल्ह्यातील ६,९८६ संस्थांची नोंदणी धर्मादाय सहआयुक्तांनी रद्द केली आहे.

लेखापरीक्षण न करणा-या ७ हजार संस्थांची नोंदणी रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : संस्थेचे नियमित लेखापरीक्षण न करणा-या जिल्ह्यातील ६,९८६ संस्थांची नोंदणी धर्मादाय सहआयुक्तांनी रद्द केली आहे. तसेच या संस्थाचालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले असून, संस्थांची मिळकत व संपत्तीही जप्त करण्यात येणार असल्याची माहिती धर्मदाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी दिली.
याबाबत पत्रपरिषदेत अधिक माहिती देताना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथील धर्मादाय सहआयुक्त भोसले यांनी सांगितले की, जिल्ह्यात नोंदणीकृत अशा ३० हजार सामाजिक, शैक्षणिक संस्था, व्यायामशाळा, वाचनालय, बहुउद्देशीय संस्था आहेत. मात्र, यातील अनेक संस्था आपले नियमित लेखापरीक्षण करीत नाहीत. याविषयी राज्य आयुक्तांच्या आदेशानुसार आम्ही जिल्ह्यातील लेखापरीक्षण न करण-या संस्थेचा शोध घेतला. त्यात १९६४ पासून ते २००४ पर्यंतच्या नोंदणी झालेल्या ६९६८ संस्था अशा आढळल्या आहेत की त्यांनी कधीच लेखापरीक्षण केले नाही. या संस्थाचालकांना नोटिसी पाठविण्यात आल्या असून, २३ आॅक्टोबर ते १९ डिसेंबरपर्यंत या संस्थेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांनी लेखापरीक्षण केलेले पुरावे दाखविले नाही तर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची मिळकत व संपत्तीही जप्त करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपायुक्त व्ही. आर. सोनुने, सहायक धर्मादाय आयुक्त एस. व्ही. एच. कादरी, सहायक धर्मादाय आयुक्त एस. के. मुळे, ए. एस. बडगुजर व जनसंपर्क अधिकारी प्रकाश जोशी यांची उपस्थिती होती.