जायकवाडी धरणात ७० टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:53 IST2017-08-30T00:53:07+5:302017-08-30T00:53:07+5:30
जायकवाडी धरणात मंगळवारी ३१०३३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी धरणाचा जलसाठा ७० टक्के झाला होता.

जायकवाडी धरणात ७० टक्के पाणीसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू असल्याने तेथील धरण समूहातील ‘ओव्हर फ्लो’चे पाणी गोदावरी व प्रवरेत सोडण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात मंगळवारी ३१०३३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी धरणाचा जलसाठा ७० टक्के झाला होता.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर -मधमेश्वर बंधाºयातून गोदावरीत १८९३० क्युसेक्स तर अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअरमधून ४४३१ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे जायकवाडी धरणात येणारी आवक वाढली आहे. यामुळे उद्या, बुधवारी सायंकाळपर्यंत धरणाची पाणीपातळी ७५ टक्क्यांपर्यंत जाईल, असे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी मंगळवारी सायंकाळी १५१५.८७ फूट एवढी झाली होती. धरणात एकूण जलसाठा २२३८.४३० दलघमी. एवढा झाला होता. यापैकी उपयुक्त जलसाठा १५००.३२४ दलघमी. एवढा आहे.