कंत्राटी ग्रामसेवकांकडे दिला ७० ग्रामपंचायतींचा कारभार
By Admin | Updated: July 16, 2014 00:49 IST2014-07-16T00:27:19+5:302014-07-16T00:49:47+5:30
सेनगाव : ग्रामसेवकांच्या वतीने विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्याने ग्रामस्थांची, विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण झाली आहे.

कंत्राटी ग्रामसेवकांकडे दिला ७० ग्रामपंचायतींचा कारभार
सेनगाव : ग्रामसेवकांच्या वतीने विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्याने ग्रामस्थांची, विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण झाली आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सुचनेवरून सेनगाव पंचायत समितीने ७० ग्रामपंचायतीचा कारभार तात्पुरत्या स्वरुपात १६ कंत्राटी ग्रामसेवकांकडे सोपविला असून तसे आदेश मंगळवारी काढण्यात आले.
विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तेरा दिवसांपासून ग्रामसेवकांचे आंदोलन सुरु असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसह, रहिवासी, जन्म-मृत्यू, नमुना ८ आदी प्रमाणपत्रे मिळत नसल्याने ग्रामीण भागातील कार्यालयीन कामकाज ठप्प झाले.
ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामस्थांची चांगलीच गैरसोय झालेली असताना या संबंधी प्रशासन कोणत्याही तात्पुरत्या उपाययोजना करीत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांनी ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या. या सुचनेच्या आधारे सेनगाव तालुक्यातील कंत्राटी ग्रामसेवकांकडे असलेल्या ग्रामपंचायती सोडून इतर ७० ग्रामपंचायतींचा कारभार पाहण्यासाठी १६ कंत्राटी ग्रामसेवकांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी काढण्यात आले.
विविध प्रमाणपत्र देण्यासाठी गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक ग्रामसेवकांकडे पाच ते सहा गावे देण्यात आली असल्याची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी पंकज राठोड यांनी दिली.
ग्रामसेवकांचा बेमुदत संप दीर्घकाळ कायम राहिला तर संपुर्ण पदभार देण्याचा निर्णयही घेण्यात येणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. (वार्ताहर)